भवानीनगर: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे शेतीमालाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. या युद्धाचा परिणाम शेतकऱ्याच्या शेतीमालावर झाला आहे. सणसर (ता. इंदापूर) येथील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे मागणीअभावी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
येथील सुनील काळे यांनी चार एकर उसाच्या पिकामध्ये कलिंगडाचे आंतरपीक घेतले होते. त्यांनी सिम्बा या कलिंगडाच्या वाणाची रोपे तयार करून लागवड केली होती. त्यासाठी चार एकरांत त्यांनी दोन लाख रुपये खर्च केले. आखाती देशात युद्ध सुरू होण्यापूर्वी व्यापाऱ्यांकडून कलिंगडाला पंचवीस रुपये किलोप्रमाणे मागणी झाली होती.
यानंतर कलिंगडाच्या तोडणीला सुरुवात झाली आणि आखाती देशात युद्ध सुरू झाले. युद्ध सुरू झाल्यानंतर कलिंगडाच्या मागणीला अद्याप व्यापारी फिरकलेच नाहीत. कलिंगडाला मागणी नसल्यामुळे दर कोसळले आहेत. युद्ध लवकर बंद होईल व कलिंगडाला मागणी वाढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्या व्यापाऱ्यांकडून कलिंगडाला मागणीच होत नाही. परिणामी, 75 टक्के कलिंगडाचे जागेवरच नुकसान झाले आहे.
चार एकरांमध्ये किमान 80 टन कलिंगडाचे उत्पादन काळे यांना अपेक्षित होते. यापैकी 50 टन कलिंगडाचे जागेवरच नुकसान झाले आहे. कलिंगडाच्या फळाला डाग पडले आहेत. केवळ 30 टन कलिंगडाची पाच ते सहा रुपये किलो याप्रमाणे विक्री करण्यात आली. यामध्ये कलिंगडाच्या उत्पादनासाठी आलेला खर्च देखील निघू शकला नाही.
80 टन कलिंगडापासून किमान 20 रुपये किलो याप्रमाणे भाव मिळाला असता तरी किमान 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. मात्र, आखाती देशातील युद्धामुळे शेतीमालाच्या मागणीवर फार मोठा परिणाम झाला असून, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.