Cow Urine Business Pudhari
पुणे

Cow Urine Business: गोमूत्रातून कोटींची उलाढाल; शेतकऱ्यांना नवे उत्पन्नाचे साधन

गुजरातमधील स्टार्टअपने गोमूत्र खरेदीतून शेतकऱ्यांना रोजगार व उत्पन्नाची नवी दिशा दिली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गायीच्या दूध आणि दुग्धजन्य उपपदार्थांची सर्वांनाच माहिती आहे. पारंपरिक व्यवसायापेक्षा गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील ‌‘त्या‌’ शेतकऱ्याने वेगळी वाट चोखाळत गोमूत्राचे शेतकऱ्यांकडून खरेदी सुरू केली. ‌‘स्टार्टअप्स‌’अंतर्गत आमचे संपूर्ण कुटुंबच बाराशे शेतकऱ्यांना रोजगाराचे नवे साधन झाले असल्याची माहिती या प्रकल्पाचे संस्थापक आणि गुजरातचे शेतकरी देवाराम पुरोहित यांनी दिली.

2017 मध्ये प्रतिदिन 50 लिटरइतके होणारे गोमूत्र संकलन आता सहा हजार लिटरवर पोहोचले आहे. संकलित होणाऱ्या गोमूत्रातून संशोधनाअंती तीन उपपदार्थ तयार करून आता आमच्या खासगी कंपनीची वार्षिक उलाढाल तीन कोटींच्या आसपास पोहोचल्याचे ते म्हणाले. येथील गौटेक 2026 च्या परिषद आणि प्रदर्शनानिमित्त शुक्रवारी (दि.20) ते कृषी महाविद्यालयात आले आहेत. वेळी संयोजक असलेले माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी त्यांची उपस्थितांना ओळख करून दिली. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली.

गोमूत्र प्रतिलिटरला पाच रुपये दराने खरेदी केले जाते. त्यासाठीचा बॅरेल शेतकऱ्यांच्या घरीच ठेवला जातो आणि आम्ही वाहतूक करून ते कंपनीत आणतो. गोमूत्रातून पाणी 50 टक्के वेगळे केले जाते. तर, उर्वरित अमोनियम रिच 30 टक्के आणि 20 टक्के पोटॅश राहते. या पदार्थात वनौषधी (झाडपाला) टाकून आम्ही तीन लिक्विड उत्पादने तयार केली आहेत. त्यामध्ये सॉईल कंडिशनर हे उत्पादन जमीन भुसभुशीत बनविण्यास मदत करते.

ज्याद्वारे पिकांच्या मुळांची वाढ उत्तम होऊन पीक चांगले हाती येते. तसेच पिकांच्या पाने व फळांवर स्प्रेद्वारे वाढ होण्यासाठी लिक्विड बाजारात आणले आणि तिसरे कीड नियंत्रणासाठी पेस्टे रेम्पेलटचा समावेश आहे. यंदा मार्च 2026 मध्ये आमच्या खासगी कंपनीची वार्षिक उलाढाल तीन कोटींच्या आसपास जाण्याची अपेक्षा असून, शेतकऱ्यांना एका वर्षात 90 लाख ते 1 कोटींपर्यंतची रक्कम आम्ही गोमूत्र खरेदीतून दिल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना काळ ठरला संजीवनी देणारा

पुरोहित यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून, त्यांची तीनही मुले सुशिक्षित आहेत. ते म्हणाले, गोमूत्र संकलनास सुरुवात करताना आम्हाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि लोक नांवे ठेवत असत. मात्र, कोरोना काळात युरिया, डाय अमोनियम फॉस्फेट आदी खतांचा तुटवडा जाणवू लागला. त्या वेळी आम्ही उत्पादित केलेल्या गोमूत्रांपासूनच्या खतांचा उपयोग शेतकऱ्यांना फायदेशीर ठरला. त्यातून आमच्या उत्पादित मालास मागणी वाढली आणि त्यातून आमच्या भागातील शेतकऱ्यांना गोमूत्रापासून आर्थिक उत्पन्न सुरू झाल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT