कळस : इंदापूर तालुक्यातील कळस येथील पेरूचे दर कोसळल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. यंदा पेरूला केवळ 6 ते 7 रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना पेरू फेकून देण्याची वेळ आली आहे. बाजारपेठेत परराज्यातून होणारी मागणी घटल्यामुळे पेरूचे दर कोसळले आहेत, तर मार्केटला पाठविण्याचा खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी चिंताग््रास्त आहेत.(Latest Pune News)
शेतकऱ्यांनी तैवान पिंक व्हीएनआर, रेड गुजरात, रेड डायमंड यासह विविध जातींच्या पेरूंची लागवड केली आहे. गेल्या वर्षी 80-100 रुपये किलो दराने विकलेला पेरू यावर्षी केवळ 6 ते 7 रुपये किलोला विकावा लागत आहे. पेरूला उन्हापासून संरक्षण देण्यासाठी आणि दर्जेदार दिसण्यासाठी शेतकरी फोम पिशव्या वापरत आहेत, ज्याचा एकरी खर्च 50 हजार ते 1.5 लाख रुपये येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान 40 ते 50 रुपये किलो दर मिळणे अपेक्षित आहे.
पेरूला एका किलोला दहा रुपये खर्च येतो, तोही निघत नाही. किमान 40 ते 50 रुपये किलो दर मिळणे अपेक्षित आहे. अशीच परिस्थिती राहिली तर पेरूच्या बागा काढाव्या लागतील, अशी प्रतिक्रिया पेरू उत्पादक परशुराम गायकवाड यांनी दिली.
बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने फेकून दिलेले पेरू. (छाया : शत्रुघ्न ओमासे)