पुणे : शेतजमिनीचा पंचनामा करण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी महिलेस 7 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. छत्रपती संभाजीराजे चौक, नाव्हरा-तळेगाव रोडवर शुक्रवारी (दि.16) ही कारवाई केली.
ग्राम महसूल अधिकारी प्रमिला नागेश वानखेडे (वय 42) असे लाचखोर महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत 56 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदारांची शिरसगाव काटा येथे वडिलोपार्जित जमीन आहे. वडिलांनी तोंडी वाटप करून दिलेल्या त्यांच्या हिस्स्याच्या शेतजमिनीची लेव्हल करत असताना भावासोबत वाद झाला होता. त्यानंतर 9 जानेवारी रोजी तलाठी कार्यालयाकडून शेतीचा पंचनामा करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. 12 जानेवारी रोजी तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले असता लोकसेविका वानखेडे यांनी ‘तुमच्या बाजूने पंचनामा करून देण्यासाठी
10 हजार रुपये द्यावे लागतील,’ अशी थेट लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने पडताळणी केली असता तडजोडीअंती लाचेची रक्कम 7 हजार रुपये निश्चित केल्याचे स्पष्ट झाले. त्याच दिवशी लाचलुचपत विभागाच्या पथकाने छत्रपती संभाजीराजे चौक नाव्हरा-तळेगाव रोड येथे सापळा रचला. त्यानंतर पंचासमक्ष तक्रारदाराकडून 7 हजार रुपये स्वीकारताना अधिकारी महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली.