नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील कांदळी एक महत्त्वाचं गाव असून या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून रविवारी (दि. ५) मतदान होत आहे. येथे दोन पॅनलमध्ये सामना रंगतोय. माजी सरपंच विक्रम भोर यांनी आपल्या पत्नीला सरपंचपदाच्या रिंगणात उतरवले आहे. विक्रम भोर यांना रोखण्यासाठी बाळासाहेब बढे, गुलाब घाडगे, गणपत फुलवडे, संग्राम फुलवडे ही मंडळी एकत्र आलेली आहेत.
मतदानाच्या एक दिवस अगोदर या गावांमध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने कांदळी हे गाव संवेदनशील गाव म्हणून प्रशासनाने जाहीर केले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या गावात देखील मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न होताना दिसतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयोवृद्ध मतदारांना मतदार केंद्रावर आणण्यासाठी विशेष स्वतंत्र काळजी घेतली जात आहे.
आपल्या गटाचा एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबतची काळजी दोन्ही गटाकडून घेताना दिसत आहे. गावामध्ये दोन गट तुल्यबळ असल्यामुळे या गटांमुळे पुन्हा वाद निर्माण होऊ नये म्हणून स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी या गावाला भेट दिली आहे. सरपंच व सत्ता आमचीच येणार अशा प्रकारचा दावा दोन्ही गट करीत आहे.
हेही वाचा