पुणे: राज्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत (सीएचबी) शिक्षकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईचा विचार, तसेच सद्य:स्थितीतील मानधन कमी असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळत नसल्याने मानधनात वाढ करण्यात आली असून, आता तासिका तत्त्वावरील शिक्षकांना २०५ ते २५० रुपये प्रतितास या नव्या दरांनुसार मानधन देण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. सुधारित मानधन वाढ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू केली जाणार आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुला-मुलींसाठी राज्यभरात १०० शासकीय निवासी शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये नियमित शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.
या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ११ महिन्यांसाठी तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक केली जाते. या पूर्वी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये निश्चित केलेले मानधन सध्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. दरम्यानच्या काळात महागाईचे प्रमाण वाढले आहे. कमी मानधनामुळे दर्जेदार शिक्षक उपलब्ध होण्यात अडचणी येत होत्या.
तसेच, निवासी शाळांचे स्वरूप लक्षात घेता शिक्षकांना केवळ अध्यापन न करता पूर्णवेळ उपस्थित राहून 'दैनंदिन पर्यवेक्षक' म्हणून काम करावे लागते. त्या-त्या इयत्तांमध्ये अपेक्षित क्षमता पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा तास घेणे आवश्यक असते. त्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळण्यासाठी तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद केले आहे.
दरमहा १०५ तासांसाठीचे मानधन देण्यात येणार
सुधारित मानधन दरांनुसार दरमहा १०५ तासांसाठीचे मानधन देण्यात येणार आहे. त्यातपूर्ण अर्हताधारक माध्यमिक शिक्षकाला २५० रुपये प्रतितास, अपूर्ण अर्हताधारक माध्यमिक शिक्षकाला २२५ रुपये प्रतितास, प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकाला २२५ रुपये प्रतितास, अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकाला २०५ रुपये प्रतितास मानधन दिले जाणार आहे. मात्र, दररोज पाच तासिका याप्रमाणे मासिक तासिका पूर्ण करणाऱ्या शिक्षकांनाच सुधारित मानधन लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.