पुणे

आरोग्यमंत्र्यांच्या खासगी कार्यालयात सरकारी कर्मचारी; रुग्णसेवेसाठी नियुक्तीचा दावा

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, दुसरीकडे आरोग्यमंत्र्यांच्या खासगी कार्यालयात कर्मचार्‍यांना ड्युटी लावण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप आरोग्य हक्क कार्यकर्त्यांनी केला आहे. राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्रातील सफाई कामगार राजू सोलंकी आणि औंध जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग सेवक अमोल माने यांना पुढील आदेश येईपर्यंत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील कार्यालयात कामकाज करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
हा प्रकार गंभीर असून, तातडीने अटकाव न केल्यास सरकारी कर्मचारी खासगी कामांसाठी वापरण्याचा पायंडा पडू शकतो. हा आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे. त्याचबरोबर आरोग्यमंत्र्यांना योग्य ती समज द्यावी; शक्य झाल्यास त्यांच्याकडून आरोग्य खाते काढून त्यांना दुसरे खाते देण्यात यावे, अशी प्रतिक्रिया आरोग्य हक्क कार्यकर्ते दीपक जाधव यांनी दिली.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष सुरू आहे. येथे दोन विशेष कार्यकारी अधिकारी काम करीत असून, त्यांना मदतीला कर्मचार्‍यांची सामान्य प्रशासनाच्या 17 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे. वैद्यकीय कक्षामार्फत आजपर्यंत हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले आहे. दोन विशेष कार्यकारी अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी हे काम करतात व रुग्णांना त्या ठिकाणाहून मदत करतात. कर्मचारी कोणत्याही खासगी कामाकरिता न वापरता रुग्णसेवेसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
– डॉ. राधाकिशन पवार, आरोग्य उपसंचालक
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT