पुणे

पुणे : पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करत रक्कम जबरीने लुटली

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा

जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीतून आणि मटक्याच्या धंद्यातून खूप पैसे मिळवायला लागला आहेस, धंदा चालू ठेवायचा असेल, तर आम्हाला दरमहा २ लाख रुपये दे, असे म्हणत युवकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चौघा जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ९ मे रोजी ही घटना घडली.

संशयितांपैकी दोघे मटका व्यावसायिक कृष्णा जाधव खून प्रकरणातील आरोपी आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर आले होते. या दोघांना पोलिसांनी अटक केली असली तरी, त्यांचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गणेश बलभीम धोत्रे (रा. नेवसे रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली. सुनील संभाजी माने, विनोद शिवाजी माने (रा. प्रगतीनगर, बारामती) व अन्य दोघा अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. सुनील व विनोद माने यांच्यावर यापूर्वी खूनाचा आरोप आहे.

फोन करून बोलावून घेतले

फिर्यादी हे घरी असताना सुनील माने याने फोन करत, 'तू रात्री साडे आठ वाजता सातव चौकात भेटायला ये, नाही आलास तर जिथे आहे तिथे जीवंत गाडून टाकीन', अशी धमकी दिली. भितीपोटी फिर्यादी रात्री तेथे गेले असताना सुनील व विनोद माने यांच्यासह अन्य दोघेजण स्विफ्ट मोटारीतून तेथे आले. तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत पत्र्याच्या शेडमागे फिर्यादीला नेण्यात आले. तेथे त्यांना शिविगाळ करण्यात आली. फिर्यादीने शिविगाळीचे कारण विचारले असता सुनील याने, तुला पैशाची खूप मस्ती आली आहे तु गाड्या विकून आणि मटक्याच्या धंद्यातून खूप पैसे कमवायला लागला आहेत, अशी आमच्याकडे पक्की खबर आली आहे. तुला जर जीवंत राहायचे असेल तर दर महिन्याला आम्हाला दोन लाख रुपये दे, अशी मागणी केली.

तलवारीने वार करण्याचा प्रयत्न

माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, मी सध्या खराब परिस्थितीतून जात असल्याचे फिर्यादी म्हणाले असताना सुनील याने कंबरेची तलवार बाहेर काढली. 'कृष्णा जाधवला संपवला, आता तुझा नंबर आहे, तुला आता जिवंत सोडणार नाही', असे म्हणत फिर्यादीच्या गळ्यावर वार केला, फिर्यादीने तो चुकवला. तेव्हा विनोद याने पाठीमागून काठीने मारून त्यांना खाली पाडले. सुनील याने नरडीवर पाय दिला. 'तुला पैसे द्यावेच लागतील नाही तर तुझा खेळ खल्लास करून टाकतो' असे म्हणत त्यांनी मारहाण केली. विनोद याने जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातील १३ हजार ३०० रुपये काढून घेतले. या प्रकारानंतर फिर्यादीने मोठ्याने आरडाओरडा केल्यावर आरोपी मोटारीतून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनील व विनोद माने यांना तात्काळ अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यl प्रकरणातील अन्य दोघे अद्याप फरार आहेत. उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ व पथकाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT