बाजार समितीत सचिवांच्या कक्षात गुंडशाही; काही काळ तणावाचे वातावरण Pudhari
पुणे

Pune Market Committee Violence: बाजार समितीत सचिवांच्या कक्षात गुंडशाही; काही काळ तणावाचे वातावरण

ठरावांची माहिती घेण्यासाठी गेलेल्यांवर दबाव तंत्राचा वापर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे बाजार समितीतील संचालक मंडळाच्या ठरावांची माहिती घेण्यासाठी गेलेल्या राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर तिऱ्हाईत व्यक्तींद्वारे दबाव तंत्राचा वापर केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.

बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्या कक्षात झालेल्या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच, याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने बाजारात या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली होती. (Latest Pune News)

पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू आहे. संचालक मंडळांच्या ठरावांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शरद गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पत्रव्यवहार करून माहिती मागविली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक यांनी बाजार समितीला लवांडे यांना माहिती देण्यास सांगितले होते.

विकास लवांडे यांच्यासह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सचिवांच्या कक्षामध्ये गेले होते. लवांडे आले समजताच सभापती प्रकाश जगताप आणि काही संचालक सचिवांच्या केबिनमध्ये येऊन लवांडे आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भोवती बसले. यावेळी बाजार समितीची माहिती देण्यावरून शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पोरांना सचिवांच्या केबिनमध्ये पाचारण करत दहशत माजवण्याच्या प्रकाराने वातावरण गरम झाल्याचे सांगण्यात आले.

गैरकारभार उघड होऊ नये, यासाठी माहितीस टाळाटाळ केली जाते. त्यामुळे सभापती जगताप, काही संचालक यांनी सचिवांच्या केबिनमध्ये 25 गुंडांना घेऊन दहशत माजवली. आमचा अपमान केला. पालकमंत्री अजित पवार यांनी पाठबळ दिल्याने हे लोक मस्तवाल आहेत. त्यामुळे शासन या चुकीच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे.
- विकास लवांडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी शरद पवार गट
संबंधित व्यक्तींनी मागितलेली माहिती देण्याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. मात्र, संबंधित लोक उलटेपालटे बोलले व गदारोळ केला, त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याबाबतचा अर्ज पोलिस ठाण्यात दिला आहे.
- प्रकाश जगताप, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT