Kalakaar Katta Controversy Pudhari
पुणे

Goodluck Chowk Kalakaar Katta Controversy: गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’वरून वाद पेटला; रहिवाशांचा हटविण्याचा इशारा

वाहतूक कोंडी, पार्किंग गोंधळ आणि ध्वनिप्रदूषणाचा आरोप; तर राष्ट्रवादीकडून कट्टा न हलवण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुडलक चौकातून भांडारकर रस्त्यावर वळणाऱ्या बसना अडथळा निर्माण होत असल्याने संबंधित कोपऱ्याची जागा रस्ता रुंदीकरणासाठी रहिवाशांकडून हस्तांतरित करून घेण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी रस्ता न करता ‌‘कलाकार कट्टा‌’ उभारण्यात आल्याने डेक्कन जिमखाना परिसरातील नागरिकांनी संतप्त भूमिका व्यक्त केली आहे. येथील कट्‌‍ट्यामुळे वाहतूक अडथळे, पार्किंगचा गोंधळ आणि ध्वनिप्रदूषण वाढल्याचा आरोप करत, ‌‘जागा रस्त्यासाठी घेतली असेल तर तेथे रस्ताच करावा,‌’ अशी ठाम भूमिका घेत प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

गुडलक चौकातील कलाकार कट्टा हलवावा, यासाठी स्थानिक नागरिक आता आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात येथील नागरिकांनी आज बैठक घेत हा कट्टा हलवण्याची मागणी केली आहे. याबाबत स्थानिकांनी महापालिका आयुक्त आणि स्थानिक नगरसेवकांकडे वस्तुस्थितीदर्शक तक्रारी सादर केल्या आहेत. या वेळी भाजपचे नगरसेवक सुनील पांडे, ॲड. मिताली सावळेकर, पुनीत जोशी आणि मंजूश्री खर्डेकर आणि डेक्कन जिमखाना रहिवासी संघाचे सचिव किशोर गोडबोले उपस्थित होते.

रहिवाशांचे म्हणणे आहे, की हा कोपरा मुळातच अरुंद असून, कला सादरीकरणासाठी आवश्यक अशी जागा उपलब्ध नाही. ‌‘येथे कार्यक्रमासाठी प्रेक्षक उभे राहण्याइतकी मोकळी जागा नाही. कला सादरीकरणाऐवजी लाउडस्पीकरवर आंदोलने, घोषणाबाजी होत असल्याने शांततेचा भंग होतो. काही वेळा घर सोडून दुसरीकडे जावे लागते,‌’ अशी तक्रार त्यांनी केली. कलाकार कट्‌‍ट्याच्या नावाखाली येणारे तरुण-तरुणी आणि इतर नागरिक वाहनांची पार्किंग घरांसमोर व नो-पार्किंगमध्ये करतात, अशीही तक्रार आहे.

त्यामुळे स्थानिकांना स्वतःच्या वाहनांची ये-जा करणे कठीण झाले आहे. ‌‘एखादी आपत्कालीन घटना घडल्यास अग्निशमन दलाची गाडीही आत येऊ शकणार नाही,‌’ अशी भीती काहींनी व्यक्त केली. ‌‘आमचा कलाकार कट्‌‍ट्याला विरोध नाही; मात्र, त्यासाठी ही जागा योग्य नाही. एखाद्या शांत, प्रशस्त आणि उद्यानासारख्या ठिकाणी तो असावा. पुणे हे कलाकारांचे शहर आहे; कला प्रोत्साहनासाठी अनेक जागा उपलब्ध आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या या कोपऱ्यात तो ठेवणे योग्य नाही,‌’ असेही रहिवाशांनी नमूद केले.

याशिवाय, काही कलाकार येथे सादरीकरणाऐवजी प्रत्यक्ष चित्र काढून विक्री करत असल्याने ‌‘सादरीकरण‌’पेक्षा ‌‘व्यावसायिकरण‌’ अधिक दिसते, अशी टीका करण्यात आली. रात्री काही जण मद्यपान करणे, भिक्षेकऱ्यांचा आसरा, तसेच फुगेवाले व रस्त्यावर वस्तू विकणाऱ्यांकडून जागेचा साठवणुकीसाठी वापर होतो, असा आरोपही करण्यात आला. त्यामुळे कट्‌‍ट्याचा मूळ उद्देश हरवल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग््रेासकडून सह्यांची मोहीम

दरम्यान, हा कलाकार कट्टा हलवू नये, यासाठी राष्ट्रवादी कॉंग््रेास मैदानात उतरली आहे. याबाबत त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ही स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सकाळी 10 पासून ते रात्री 8 पर्यंत ही सह्यांची मोहीम राहणार असून, याला तरुणांचा प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT