Accident Pudhari
पुणे

Gokak Road Accident: यल्लम्मादेवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील मांडरे कुटुंबावर काळाचा घाला; चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू

गोकाक तालुक्यात कार-ट्रकची समोरासमोर भीषण धडक; तिघे गंभीर जखमी, लोणंदचे रहिवासी असलेले कुटुंब पुण्यात स्थायिक

पुढारी वृत्तसेवा

गोकाक: सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मादेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या पुण्यातील मांडरे कुटुंबावर काळाने घाला घातला. गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ रविवारी (दि. १५) पहाटे कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह तिघे जागीच ठार झाले. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ­­­­

ओंकार चंद्रशेखर मांडरे (२६), रेश्मा मांडरे (३२) आणि देवांश मांडरे (४) अशी मृतांची नावे आहेत. तर श्रीकांत मांडरे, वंदना मांडरे आणि हर्षदा मांडरे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण पुण्याचे रहिवासी असून मूळचे लोणंद (ता. फलटण) मधील आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, मांडरे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रितपणे पुण्याहून सौंदत्तीतील यल्लम्मादेवीच्या दर्शनासाठी कारने चालले होते. गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ त्यांच्या कारची यरगट्टीहून गोकाकच्या दिशेने येणाऱ्या ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली.

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण धडकेनंतर कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले.

गंभीर जखमी झालेल्या श्रीकांत मांडरे, वंदना मांडरे, हर्षदा मांडरे यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT