पुणे : औषधाच्या आडून गोवा बनावटीच्या विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे.
भोर तालुक्यातील सारोळा गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने विविध विदेशी बँडच्या दारूच्या बाटल्या, ट्रक, चारचाकी वाहन, मोबाईलसह एकूण 43 लाख 57 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली आहे. संपत लक्ष्मण गावडे (वय 59, रा. आंबेगाव बुद्रुक), समीर गणपत राऊत (पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनात गस्तीवर असलेल्या पथकाने बुधवारी (दि. 17) दुपारी 4 वाजता भोर तालुक्याच्या हद्दीत एक संशयित ट्रक थांबवून त्याची तपासणी केली. चालकाने वाहनात औषधे असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात औषधांच्या आडून गोवा राज्यनिर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विविध बँडच्या एकूण 186 विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पथकाने ट्रक व मोबाईलसह सुमारे 17 लाख 99 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तपासादरम्यान पथकाने आंबेगाव बु. परिसरात छापा टाकून राऊत याला अटक केली. त्याच्या ताब्यातील वाहनात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच, आरोपी गावडेच्या आंबेगाव बुद्रुक येथील राहत्या घरी छापा टाकून विविध बँडची दारू जप्त करण्यात आली. एकूण 43 लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक संभाजी बर्गे, दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते, प्रणव मेहता, शीतल शिंदे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करत गोवा राज्यनिर्मित व बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला. येथून सुमारे 4 लाख 71 हजाराचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली.
परराज्यातील मद्य तस्करीचा बंदोबस्त करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने 21 पथके जिल्ह्यात तैनात केली आहेत. अशाप्रकारच्या गुन्ह्यात गुंतलेल्या सराईतावर पाळत ठेवली जात असून, रात्रगस्त तसेच संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अतुल कानडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पुणे