पुणे: नियमित व पुरेशा प्रमाणात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा, अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करा, रस्त्यावरील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था करा, उद्याने आणि खेळाच्या सुविधा तयार करा, रुग्णालय उभारा अशा विविध मागण्यांसाठी धानोरी व लोहगाव येथील सुमारे 300 सोसायट्यांमधील नागरिकांनी पालिकेवर धडक मोर्चा काढत आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले.
नागरिकांच्या मागण्या ऐकून त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन या वेळी आयुक्तांनी दिले. धानोरी व लोहगाव परिसरात अनेक मूलभूत सुविधा नसल्याने येथील 300 हून अधिक गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधित्व करणार्या सुमारे 200 पेक्षा अधिक नागरिकांनी मंगळवारी (दि. 10) पुणे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. (Latest Pune News)
या आंदोलनाद्वारे सुमारे चार लाख नागरिकांच्या दीर्घकालीन नागरी प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. धानोरी लोहगाव रेसिडेंट्स असोसिएशन यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. या संघटनेचे अध्यक्ष गिरीश जैवक यांनी विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले.
यावेळी जैवक व उपाध्यक्ष प्रसन्ना पाटील म्हणाले, धानोरी व लोहगावमधील नागरिक पालिकेला कर भरतात, तरीही नागरी सुविधा मिळत नाहीत. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आणखी मोठे आंदोलन करण्यात येईल. दरम्यान, आयुक्त नवल किशोर राम यांनी निवेदन स्वीकारले असून स्वतः धानोरी लोहगाव परिसराची पाहणी करून उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.
तर, अतिरिक्त आयुक्त चन्द्रन यांनी या परिसराला पुरवण्यात येणार्या पाण्याची टेस्ट करून 10 दिवसांत शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले. या वेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, आमदार बापू पठारे, शिवसेनेचे सुधीर जोशी, सुधीर कुरुमकर, संदीप शिंदे, राष्ट्रवादीचे राजेंद्र खांदवे, सुनील खांदवे, शशी टिंगरे, मनोज पांडे, संतोष पाटोळे उपस्थित होते.