Ghorawadi Dam Water Shortage Pudhari
पुणे

Ghorawadi Dam Water Shortage: पुरंदरच्या घोरवडी धरणातील पाणीउपशावर नियंत्रणाची मागणी; ४० ते ५० पंपांद्वारे उपसा होत असल्याचा आरोप

पाणीसाठा घटत असल्याने चिंता; पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासह अनधिकृत उपशावर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सासवड: अल निनोचा संभाव्य प्रभाव, पावसाचे कमी प्रमाण आणि वाढत्या तापमानामुळे पुरंदर तालुक्यातील घोरवडी धरण परिसरात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. त्यातच धरण परिसरात ४० ते ५० वीजपंपांद्वारे अनियंत्रित पाणीउपसा होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याबरोबरच कथित अनधिकृत उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

घोरवडी धरणाची एकूण साठवण क्षमता ६७.५० दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याची माहिती पाटबंधारे शाखेचे अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.

उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर प्राधान्यक्रमाने करणे, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आणि साठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक बनले आहे.

या धरणातून दिवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून, सासवड शहरासह सुपे-घोरवडी, शिवतारे वस्ती, चव्हाण वस्ती, पिंपळे, पोमणनगर, दातेमळा आणि भिवडी या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. याशिवाय परिसरातील ५५ हेक्टर शेती धरणाच्या पाण्यावर अवलंबून असल्याची माहिती पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनी दिली.

धरण परिसरात सध्या ४० ते ५० वीजपंपांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणीउपसा केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या उपशावर नियंत्रण नसल्यास उपलब्ध पाणीसाठ्यावर अतिरिक्त ताण येऊन गावांच्या नियोजित पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती घोरवडी जलाशय पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी व्यक्त केली.

धरण आणि मुख्य कालव्यांमधून होणारा अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभागाचे संयुक्त पथक नेमावे, अशी मागणी सुपेचे माजी उपसरपंच संतोष जाधव यांनी केली.

प्रशासनाने पाणीवाटपाचे नियोजन करण्याबरोबरच धरण परिसरातील पाणीउपशाची प्रत्यक्ष तपासणी करून अनधिकृत उपसा आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT