निमोणे: चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणातून डावा व उजवा कालव्याद्वारे उन्हाळी आवर्तन सुरू झाल्यानंतर उपयुक्त पाणीसाठा संपल्याशिवाय आजपर्यंत कधीच आवर्तन बंद केले नव्हते. यंदा मात्र 31 ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी हे उपयुक्त साठ्यातूनच शिल्लक ठेवा, असा दस्तुरखुद्द जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिला आहे. त्यानुसार दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत.
सध्या घोड धरणामध्ये 0.177 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याचे घोड शाखा अभियंता वैभव काळे यांनी सांगितले. दरम्यान, अनेक वर्षापासून एप्रिल महिना उजाडल्यानंतर श्रीगोंदा व शिरूरचे लोकप्रतिनिधी घोडचे उन्हाळी आवर्तन पूर्ण क्षमतेने देण्यासाठी आग््राही राहायचे. घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असेपर्यंत सर्व पाणी उन्हाळी आवर्तनालाच वापरायचा, असा अलखित नियम होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.
घोड धरणावरून दोन्ही तालुक्यातील अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित झाल्या. शेकडो कोटी रुपयाची जलजीवन योजनेची कामे मार्गी लागली. या योजनांना मंजुरी देताना घोड धरणातून किती पाणी उचलले जाणार आहे, याचा लेखाजोखा सुरुवातीलाच मांडण्यात आला आहे.
मुळातच घोड धरणाची साठवण क्षमता पाच टीएमसी आहे. यातून रांजणगाव औद्योगिक वसाहत, रांजणगाव, कारेगाव आदी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा शहर, काष्टी अशा 15 ते 20 गावांच्या योजना येथूनच कार्यरत आहेत. शिरूर शहरासाठी योजनाही घोड धरणावरूनच प्रस्तावित आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी एक टीएमसीच्या वर पाणी वापरले जाते, मात्र टंचाई काळात हे पाणी कुकडी प्रकल्पातून घोड धरणात सोडले जात नाही. त्यामुळे घोडच्या लाभ क्षेत्रातील शेतीवर परिणाम दिसू लागले आहेत. प्रस्तावित साकळाई योजनेमुळे घोड धरणातील 1.80 टीएमसी पाणी उचले जाणार आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभर एक टीएमसी पेक्षा जास्त पाणी आरक्षित करावे लागणार आहे. त्यामुळे घोडच्या एकूण साठ्यातून फक्त सव्वादोन टीएमसी पाणी शेतीसाठी वापरता येईल. याचे गंभीर परिणाम भविष्यकाळात घोड धरणाच्या लाभ क्षेत्रात पाहायला मिळतील. त्यामुळेच साकळाई प्रकल्पाला मोठा विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे.