निमोणे: शिरूर व श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणाच्या हद्दीतील वृक्षतोडीमुळे स्थानिकाबरोबरच वृक्षप्रेमींमध्येही संतापाची भावना निर्माण झाली आहे. काटेरी झाडे काढता काढता, धरण परिसराची शोभा वाढवणारे लिंब, बोर, चिंच यासारखी झाडे तोडून नक्की काय साध्य केलं हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
घोड धरणाच्या डाव्या कालव्याबरोबरच धरणाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणामध्ये काटेरी झाडे वाढली होती. धरण प्रशासनाने काटेरी झाडे काढण्यासाठी जेसीबी, पोकलेनचा वापर करून काटेरी झाडे काढली. ही साफसफाई करताना धरण परिसराची शोभा वाढवणारे 30-35 वर्षांची जुनी लिंबाची व इतर देशी वाणाची झाडे भुईसपाट करण्यात आली. प्रशासनाच्या या साफसफाईने स्थानिक संशयाने पाहू लागले आहेत.
या झाडांचा धरणाला नक्की काय त्रास होता, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. धरणाच्या दगडी पिचिंगमध्ये काटेरी झाडं- झुडपं वाढली होती. ती साफ करायला कोणाचीच हरकत नव्हती. मात्र, ज्या झाडांमुळे धरण परिसराला मोठी शोभा येत होती ती झाडे तोडून नक्की काय मिळवले, अशी चर्चा या परिसरात आहे. घोड पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील देशी झाडांची कत्तल अनेकांच्या जिव्हारी लागली आहे. दरम्यान, वृक्षतोडीची वन विभागाने दखल घेतली आहे.
वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, अवजड यंत्राच्या साह्याने तोडलेल्या झाडांचे पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, शाखा अभियंता वैभव काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, घोड धरणाच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांचा विळखा पडला होता. या झुडपांची अशाच पद्धतीने वाढ झाली असती तर पिचिंगमध्ये लावलेले दगड हे बाजूला सरकून धरणाला धोका निर्माण झाला असता.
हे मातीचे धरण आहे, त्यामुळे धरणाच्या मातीबंधाऱ्याला धोका होईल असे कोणतेही कृत्य प्रशासन होऊ देत नाही. डागडुजी करीत असताना काही झाडे तुटली असतील तर त्याची माहिती घेतो. धरण प्रशासनाकडून भविष्यकाळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.