निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणात कुकडी प्रकल्पातून 45 हजार क्युसेकने पाण्याची आवक होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून घोड धरणाचे सतरा स्वयंचलित दरवाजे दोन फुटाने उचलून नदीपात्रात 35 हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. घोडच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची आवक वाढू शकते. त्यामुळे घोड धरणातून विसर्गाचे प्रमाण वाढवले जाऊ शकते, असे घोड शाखा अभियंता वैभव काळे यांनी सांगितले.(Latest Pune News)
घोड धरणात सध्या 87 टक्के पाणीसाठा आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता साडेसात टीएमसी असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कुकडी प्रकल्पातील सर्व धरणे येतात. घोडच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने कुकडी प्रकल्पातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. डिंभे, वडज, येडगाव आदी धरणातून व पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे सातत्याने घोड धरणात पाण्याची आवक होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून घोड धरणाचे 17 स्वयंचलित दरवाजातून नदीपात्रात 35 हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे धरणाखालील अनेक गावांत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.