

पुणे: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुपरवायझरी ॲक्शन फेमवर्क तथा सॅफ निर्बंधातून पुणे विभागातील नऊ सहकारी बँका बाहेर आल्या आहेत. त्यामध्ये जनसेवा सहकारी बँक, जयहिंद अर्बन को-ऑप. बँक, इंद्रायणी को-ऑप. बँक, पुणे अर्बन को-ऑप. बँक, सन्मित्र सहकारी बँक, सुवर्णयुग सहकारी बँक, धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप. बँक, दी मुस्लिम को-ऑप. बँक तसेच राजगुरुनगर सहकारी बँकेचा समावेश आहे.
पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि.26) बँकेच्या शिवाजीभाई ढमढेरे सभागृहात माजी अध्यक्ष व विद्यमान सचिव ॲड. सुभाष मोहिते यांच्या उपस्थितीत व नवनिर्वाचित अध्यक्ष नीलेश ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. (Latest Pune News)
या वेळी व्यासपीठावर असोसिएशनचे ॲड. साहेबराव टकले, रमेश वाणी, विजय ढेरे, डॉ. प्रिया महिंद्रे व अन्य संचालक उपस्थित होते. पुणे नागरी सहकारी असोसिएशनच्या बँक संचालकांच्या हस्ते सॅफमधून बाहेर आलेल्या संबंधित बँकांच्या पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष नीलेश ढमढेरे म्हणाले, नागरी सहकारी बँकांना जे सॉफ्टवेअर लागते, ते कमीत कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशनकडून बँकांना सहकार्य केले जाईल.
तसेच नागरी सहकारी बँकांनी अंबेला ऑर्गनायझेशनचे सभासद होण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा, असा ठराव संमत करण्यात आल्याचे नमूद केले.सभेचे सूत्रसंचालन असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके तर आभार उपाध्यक्ष रमेश वाणी यांनी मानले.
राज्यातील नागरी सहकारी बँकांना उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सीईओची आवश्यकता आहे. तो अधिकारी बाहेरून घेऊन बँकेची सर्वांगीण वाढ होऊ शकत नाही, तर तो आपल्याच बँकेच्या संस्कृतीमध्ये वाढलेला स्टाफ असेल तर तो बँकेच्या व्यवसाय वाढीस पूरक ठरणार आहे. त्यासाठी असोसिएशनने सीईओ डिप्लोमा तयार केला असून त्यात स्टाफमधील सेवकांना पाठविण्यास प्राधान्य द्यावे.
- ॲड. सुभाष मोहिते, मानद सचिव, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन