वाल्हे : घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी लाकडी बांबूच्या परडीची निर्मिती वाल्हे (ता. पुरंदर) येथे करण्यात येते. याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच, शहरी भागातील ग्राहकांसाठी काही परड्या पुण्याकडे रवाना करण्यात येत आहेत. (Pune Latest News)
वाल्हे येथील बुरुड समाजातील काही कारागीर बांबूपासून विविध वस्तू तयार करतात. ते पारंपरिक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह भागवीत असतात. मागील दोन-अडीच महिन्यांपासून बुरुड समाजातील काही कारागीर परड्या बनविण्यासाठी उद्योगात गुंतले होते.
पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये घटस्थापनेसाठी या परड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बांबूची पाती (पावक) काढून परडी बनविण्याचे काम मागील दोन-तीन महिन्यांपासून कारागीर करीत आहेत. आता घटस्थापना अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर बनविलेला माल पुणे शहरात पाठविण्यात येत आहे. या परड्या ठोकभावाने व्यापारीवर्गाला दिल्या जातात.
सध्या पारंपरिक धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मिळणारा कच्चा माल, त्यापासून बनवली जाणारी वस्तू, त्याला लागणारा वेळ व खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न, याचा ताळमेळ बसत नाही, अशी खंत कारागीर सुलोचना सपकाळ यांनी व्यक्त केली. घटस्थापनेला फक्त पाच दिवस बाकी असून, आजपर्यंत हजारो परड्या पुणे शहरात विक्रीसाठी मालवाहतूक वाहनातून पाठविण्यात असल्याची माहिती परडी कारागीर नरेंद्र सपकाळ, विनोद सपकाळ यांनी दिली.
वडिलांपासून पारंपरिक व्यवसाय करण्याची आवड आहे. परडीसाठी लागणारा कच्चा माल सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून आणला जातो. सध्या बांबूंचा भाव वाढला असून, तो दोनशे रुपये प्रतिनग असा आहे. बांबू वाहतुकीसाठी गाडीभाडे असते. त्यापासून बनविल्या जाणार्या वस्तूंना मात्र योग्य किंमत मिळत नाही. सध्या परडीला ठोकभाव 25 रुपये मिळत आहे. परडीचा मिळत असलेला मोबदला तसा परवडत नाही. मात्र, पारंपरिक व्यवसाय म्हणून हे काम सुरू ठेवले.- संतोष महादेव सपकाळ, कारागीर, वाल्हे