पुणे: राज्यातील शेतकरी आणि नागरिक यांना जमिनीशी संबंधित सातबारा, 8 अ ही जमिनीशी निगडित असलेली कागदपत्रे आता 1 ऑगस्टपासून ‘व्हॉट्सअॅप’वर मिळणार आहेत. त्यासाठी भूमिअभिलेख विभागाने पुढाकार घेतला असून, या विभागाचे डिजिटल क्रांतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे.
राज्यातील शेतकरी, नागरिकांना जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी सेतू केंद्रांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यासाठी हजारो क्षसपये मोजावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन भूमिअभिलेख विभाग शेतकरी, नागरिकांना व्हॉट्स अॅपवर सातबारा, 8 अ उतारा, ई-रेकॉर्ड ही कागदपत्रे उपलब्ध करून देत आहे. (Latest Pune News)
त्यासाठी माफक शुल्कात नोंदणी करता येणार आहे. महाभूमी संकेतस्थळावरून ही सुविधा थेट संबधितांच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होणार आहे. यातून सुविधाकेंद्र तसेच खासगी व्यक्तींना अतिरिक्त पैसे देण्याची गरज भासणार नाही. राज्यात सातबारा उतारे आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. ते मिळविण्यासाठी केवळ 15 रुपये शुल्क भरून ही सुविधा घेण्यात येते.
मात्र, यासाठी शेतकरी, नागरिक यांना सेतू किंवा महा-ई सेवा केंद्रावर जाऊन 15 रुपयांच्या शुल्काव्यतिरिक्त जादाचे पैसे मोजावे लागतात. त्यातही हा उतारा किंवा दाखला संबंधितांच्या संगणकावर डाऊनलोड होतो. त्यानंतर पेनड्राईव्हमधून तो शेतकर्याला घ्यावा लागतो.
यात या उतार्याचा गैरवापर होण्याची भीती असते. त्यासाठी भूमीअभिलेख विभागाने ही सुविधा व्हॉट्स अॅपवरून देण्याचे योजले आहे. महाभूमी संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक टाकल्यास केवळ 15 रुपयांत सातबारा आणि 8 अ उतारा थेट व्हॉट्सअॅप क्रमांकावर मिळणार आहे. यामुळे हा उतारा संबंधित शेतकर्याला सोयीनुसार वापरता येईल. उतार्याची सुरक्षितता कायम राहून त्याचा गैरवापरही थांबेल. या उतार्यासह मिळकत पत्रिका ई-रेकॉर्डमधील दाखलेही मिळणार आहेत.
‘महाभूमी’वर करावी लागणार नोंदणी
भूमिअभिलेख विभागाची ही सेवा तीन स्तरांवर देण्यात येणार आहे. त्यात माहिती, सुविधा आणि सूचना यांचा समावेश आहे. यासाठी शेतकर्यांना महाभूमी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. त्यात त्याच्या जमिनीशी संबंधित असलेल्या अधिकार अभिलेखाची नोंद आवश्यक असेल. अर्थात जमीनमालक असल्याचा पुरावा असणे आवश्यक असेल. नोंदणीसाठी 50 रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.
त्यानंतर शेतकर्यांना ही सेवा उपलब्ध होईल. त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित विविध शंका व चौकशीसाठी त्वरित मदत मिळणार आहे. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ही सेवा देण्यात येणार असून, भूमिअभिलेखाशी संबंधित कायदे, प्रक्रिया, कागदपत्रांची उपयोगिता यांची माहिती देण्यात येईल. तसेच जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास, संबंधित मालकाला त्याची सूचना थेट व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. यामध्ये जमिनीची मोजणी, फेरफार, नकाशा बदल आदीसंबंधीच्या नोटीसांचा समावेश असेल.
ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिक यांना मोबाईलच्या माध्यमातून जमीन अभिलेखांबाबत पारदर्शक व तत्काळ सेवा मिळाल्यानेभ्र ष्टाचाराला आळा बसेल.- सरिता नरके, प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त, पुणे