पुणे : पुढारी वृत्तसेवा
रेल्वेच्या पुणे-मुंबई दरम्यान धावणार्या 5 रेल्वे गाड्यांमध्ये 1 ते 2 कोचद्वारे रेल्वेने जनरल तिकिटाची सुविधा सुरू केली आहे.
उर्वरित नियमित लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही सुविधा पुढच्या महिन्यात 29 जूननंतर सुरू होणार आहे. सध्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, इंटरसिटी या गाड्यांमध्ये जनरल तिकीटाची सुविधा देण्यात आली आहे.
कोरोना काळात रेल्वेच्या गाड्यांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व गाड्यांचे सर्व डबे आरक्षित केले होते. त्यामुळे अजूनही सर्व डब्यांना आरक्षणाचे वेटिंग आहे. त्यातच आता महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त झाला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने डबे आरक्षित असल्यामुळे जनरल डब्यांची सुविधा पूर्ण क्षमतेने पूर्वीप्रमाणे सुरू केलेली नाही. प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
रेल्वे प्रशासनाने पुणे-मुंबई दरम्यान धावणार्या 5 आणि हॉलिडे स्पेशल गाड्यांसाठी सध्या जनरल तिकीट सुविधा सुरू केली आहे. यात दानापूर, झांशी, कानपूर, करमाली यठिकाणी जाणार्या हॉलिडे स्पेशल गाड्यांमध्ये प्रवाशांना जनरल तिकीट उपलब्ध आहे.
रेल्वेकडून पुणे-मुंबईदरम्यान धावणार्या 5 गाड्यांमध्ये आणि हॉलिडे स्पेशल गाड्यांमध्ये जनरल तिकीट सुविधा सध्या सुरू केली आहे. उर्वरित नियमित लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये जनरल तिकीट सुविधा 29 जूननंतर सुरू करण्यात येईल.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग