भिगवण : भिगवण येथील यात्रोत्सवाच्या बैठकीत झालेल्या गदारोळामुळे यात्रेला यंदा गालबोट लागणार की काय, असे वाटले होते. परंतु, आता मात्र भिगवणची यात्रा एकोप्याने, तीही उत्साहात साजरी करण्याचा निर्णय एकमुखाने झाला आहे. त्यातच लावण्यावती गौतमी पाटील ही रंगमंचावर आपली अदा व जलवा दाखवणार आहे. कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख आपला डाव दाखवणार असल्याने भिगवणची यात्रा विविध मनोरंजनामुळे धडाक्यात साजरी होणार आहे.
भिगवणचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा सोमवार (दि. 21) व मंगळवारी (दि. 22) पार पडत असली तरी यात्रा चार दिवस चालणार आहे. रविवारी (दि. 20) अन्नदात्यांनी महाप्रसाद कार्यक्रम ठेवला आहे तर बुधवारी (दि. 23) महिलांसाठी ’दिलबरा तुमच्यासाठी’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला आहे.
भिगवणची यात्रा जुने भिगवण व पुनर्वसित गावठाण अशा दोन ठिकाणी भरवली जाते. त्यानिमित्त दोन्ही मंदिराभोवतालची साफसफाई करून विद्युत रोषणाईचे काम प्रगतीपथावर आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सरपंच गुराप्पा पवार, उपसरपंच सत्यवान भोसले, मंदिराचे पुजारी सोमनाथ व गोपाळ गुरव यांनी दिली.
रविवारी पहाटे नवीन गावठाण मंदिर ते जुने मंदिरापर्यंत महिलांची दंडवत घालण्याची परंपरा आहे. सकाळी सहा वाजता भैरवनाथ महाराजांना अभिषेक घालून यात्रा आरंभ होणार आहे. त्यानंतर 9 वाजता मुखवटे व पोशाख, सायंकाळी चार वाजता शेरणी वाटप, 8 वाजता छबिना प्रस्थान, रात्री 11 वाजता शोभेचा दारूगोळा व 12 वाजता मनोरंजनपर फुलवंती ऑर्केस्ट्रा होणार आहे.
मंगळवारी सकाळी 8 वाजता मान वाटप, 9 वाजता आखाडा पूजन आणि 10 वाजता प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटील गाण्यावर थिरकणार आहे. संध्याकाळी आखाड्याचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख यांच्यासह इतरही नामवंत पैलवान आखाड्यात उतरणार आहेत. बुधवारी महिलांसाठी ’दिलबरा तुमच्यासाठी’ हा मनोरंजनपर कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.