पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने आठवड्यापूर्वी सुरू केलेल्या गॅस दाहिनीसाठी गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे पार्थिवावर लाकडावर अंत्यसंस्कार करावे लागले. गॅसपुरवठा सुरळीत होत नसेल, तर गॅस दाहिनी सुरू करण्याची घाई कशासाठी करण्यात आली, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थकि स्थिती नाजूक झाली. आर्थकि संकटात सापडलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मदतीला विविध सामाजिक संघटना समोर येत आहेत. मात्र, त्यानंतरही बोर्ड प्रशासन नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवू शकत नाही.
केंद्र शासनाकडून मिळणारा निधी कर्मचा-यांच्या वेतनासाठी ठेवला जात आहे. त्यातून नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्याइतपत निधी मिळत नाही. विविध सामाजिक संस्थांनी मदत केल्यानंतरही बोर्डासमोर आर्थकि चणचण असल्याने, ते कोणतेही नवीन प्रकल्प स्वतः न चालवता ते खासगी संस्थेकडे चालविण्यासाठी देत आहेत.
घटना क्रमांक -1
सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात सुसज्ज असे आयसीयू आणि शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले. मात्र, आयसीयू चालविण्याची प्रशासनाची क्षमता नसल्याने लाखो रुपये खर्च करून तयार केलेले आयसीयू हे खासगी कंपनीच्या घशात घालण्यात आले. तेथे अनामत रक्कम भरल्याशिवाय रुग्णांवर उपचार करत नसल्याचे प्रकार उघडकीस आले.
घटना क्रमांक -2
धोबीघाट स्मशानभूमीमध्ये उभारलेल्या गॅस दाहिनीचे 23 जूनला उद्घाटन करण्यात आले. मात्र, गुरुवारी सकाळी नाना पेठेतील मंजुळाबाई चाळ येथील एका व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्या पार्थविावर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करायचे होते. परंतु, गॅसदाहिनी बंद असल्याने त्याच ठिकाणी पार्थविाचे लाकडांवर अंत्यसंस्कार करावे लागले.
गॅस संपल्यामुळे नवीन सिलिंडर जोडण्यासाठी थोडा वेळ लागतो. सकाळी गुरुवारी सकाळी नातेवाइकांनी एका मृतदेहावर लाकडांवर अंत्यसंस्कार केले. गॅस दाहिनीला एमएनजीएलचा गॅसपुरवठा केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल.
– विजय चव्हाण, अधीक्षक, विद्युत विभाग, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड
हेही वाचा