सासवड: पुरंदर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले सासवड शहरात लोकवस्तीनजीक मोकळ्या जागा व महामार्गालगत विविध प्रकारचा कचरा निष्काळजीपणे टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. घंटागाडीची वेळ चुकणारे बेजबाबदार नागरिक, वाहन-चालकांकडून महामार्गालगत व मोकळ्या जागेत हा कचरा टाकला जात आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे.
कचरा टाकणार्या बेजबाबदार नागरिकांवर सासवड नगरपालिकेने व आरोग्य विभागाने कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. तसेच, माजी उपनगराध्यक्ष दीपक टकले, माजी नगरसेवक सोनुकाका जगताप, शिवसेना सासवड शहराध्यक्ष मिलिंद इनामके, भाजपनेते जालिंदर जगताप, सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदयकुमार जगताप आदींनी ही कारवाई करण्याची मागणी केली.
सासवड शहरात किर्लोस्कर कंपनीनजीक रस्त्यालगत वाहनातून कचरा टाकला जातो. असाच प्रकार गणेश मंगल कार्यालयापासून सोपाननगरचा रस्ता तसेच सोनोरी रस्ता, आंबोडी रस्ता, वाघडोंगर रस्त्यालगत मोकळ्या जागेत, तिथून महामार्गकडे जाणार्या कच्च्या रस्त्यालगत, कर्हा नदीतही रात्री कचरा टाकाल जात आहे. वर्षानुवर्षे कचरा संकलनासाठी दारोदारी घंटागाडी फिरत असतानाही बेजाबदार नागरिक अशा प्रकारे कचरा टाकत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज
शहरातील हॉटेल, परमिटरूम, बार, दुकाने, विविध व्यावसायिकांचाही कचरा, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या बंदी असताना सर्रास वापरल्या जातात. असाही कचरा विविध रस्ते, महामार्गालगत टाकला जात असल्याने अशा बेजबाबदार नागरिकांचा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणी सासवड नगरपालिकेकडे आरोग्यप्रमुख मोहन चव्हाण यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.
नैसर्गिक घाटमार्गाच्या झाल्या कचराकुंड्या
पुरंदर तालुक्यात येणारे विविध नैसर्गिक घाटमार्गाच्या स्थानिक व शहरी नागरिकांनी कचराकुंड्याच केल्याचे चित्र पाहयला मिळत आहेत. कालबाह्य केमिकल्स, औषधे, विविध तुटक्या वस्तू, खराब गाद्या, उशा, थर्माकोल, बाटल्या, पत्रावळी, प्लास्टिक मटेरिअल, राडारोडा टाकून घाटमार्गालगत पर्यावरणाला बाधा आणली जात असल्याचे पाहयला मिळत आहे.