खेड : खेड पोलिस ठाण्यातील गणपती मूर्तीची विसर्जन मिरवणुक डिजेच्या गोंगाटाऐवजी पारंपरिक वाजंत्र्यांच्या मधुर स्वरांनी आणि फुलांच्या उधळणीसह खाकी वर्दीतील पोलिसांनी बाप्पाच्या विसर्जनात उत्साहाने नृत्य केले. राजगुरुनगर शहराच्या मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले. (Latest Pune News)
या मिरवणुकीचा शुभारंभ आमदार बाबाजी काळे आणि अतुल देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी संजय घनवट, विजया शिंदे, कैलास सांडभोर आणि ॲड. मनिषा टाकळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि संतोष घोलप यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
खेड पोलीस ठाण्यात गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणुक संध्याकाळी काढण्यात येतात. त्यासाठी रात्रभर पोलिसांना बंदोबस्तात व्यस्त रहावे लागते. म्हणुन त्यापूर्वी म्हणजे शनिवारी (दि ६) दुपारी एक वाजता पोलीस ठाण्यात आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते प्रारंभ करून गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. पोलिसांनी पारंपरिक संगीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेऊन सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. हा अनोखा उपक्रम परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला.