निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी; लाडक्या बाप्पाला आज निरोप... Pudhari
पुणे

Pune Ganesh Visarjan 2025: निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी; लाडक्या बाप्पाला आज निरोप...

ढोल-ताशांच्या गजरात निघणार भव्य मिरवणुका; भक्तिरंगात न्हाले पुणेकर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे केलेली आराधना अन् बाप्पाच्या आगमनाने रंगलेले भक्तिपूर्ण वातावरण गणेशोत्सवात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात रंगले. शनिवारी (दि. 6) अनंत चतुर्दशीला म्हणजेच आज पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देणार आहेत.

गणेशोत्सवाच्या आनंद सोहळ्याची शनिवारी सांगता होणार असून, प्रत्येकाच्या जीवनात आनंद, ऊर्जा अन् उत्साहाचे रंग भरून बाप्पा सर्वांचा निरोप घेणार आहेत. आज जल्लोषपूर्ण वातावरणात अन् ढोल-ताशांच्या गजरात पुण्यातील वैभवशाली मिरवणुकीची परंपरा पुणेकरांना अनुभवायला मिळणार असून, घरोघरीही श्री गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष सगळीकडे दुमदुमणार आहे. (Latest Pune News)

गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या मंगलमय उत्सवाने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा भक्तिरंगात न्हाऊन गेला. रोजची पूजा, आरती, अथर्वशीर्षपठण अशा धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक उपक्रमांनी उत्सवामध्ये रंग भरले. दहा दिवसांमध्ये मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी श्री गणेशभक्तांनी गर्दी केली.

या उत्सवाचा अनंत चतुर्दशीला निघणार्‍या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने कळसाध्याय गाठला जाणार आहे. शनिवारी (दि. 6) पुण्यातील देदीप्यमान गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा अनुभवायला मिळणार आहे. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह मानाच्या गणपतींना पुष्पहार अर्पण करून आरती झाल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.

त्यानंतर श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाच गणपती मंडळांची मिरवणूक मार्गक्रमण करणार आहे. पावसाच्या दृष्टीनेही मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची तयारी केली आहे.

ढोल-ताशांचा गजर, बँड पथकांचे उत्कृष्ट वादन, फुलांनी सजविलेले रथ आणि चांदीच्या पालखीत विराजमान झालेले बाप्पा आणि प्रबोधनात्मक देखावे... अशी वाजतगाजत आणि थाटात विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्तही असणार आहे. मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांची अलोट गर्दीही होणार आहे. काही मंडळांनी ढोल-ताशा पथकांच्या वादनावर भर दिला आहे. तसेच, काही मंडळांनी डीजे वाजवण्याला प्राधान्य दिले आहे.

मंडळांसह घरगुती गणपतीलाही भावपूर्ण निरोप दिला जाणार असून, शनिवारी मंडळांच्या आणि घरगुती गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात खास तयारी करण्यात आली आहे. यंदा मंडळांसह घरगुती गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन भाविकांना घाटांवर करता येईल. महापालिकेने घाटांवर तयार केलेले हौद, महापालिकेच्या फिरत्या हौदातही विसर्जन करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT