

Pune Ganesh Visarjan Miravnuk 2025 Timing & Parking Guide
पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ही राज्यभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. पुणे- पिंपरी चिंचवडमधील भाविक मोठ्या संख्येने गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी पेठ परिसरात येतात. कोणता गणपती बेलबाग आणि टिळक चौकात किती वाजता येईल, कुठून गणपती मिरवणूक बघता येईल हे जाणून घ्या ‘पुढारी पुणे गणेश विसर्जन गाईड’मधून. वर्षानुवर्षे गणेश विसर्जन मिरवणुकीचं वार्तांकन करणाऱ्या वार्ताहरांनी पुढारी डिजिटलच्या वाचकांसाठी हे गाईड तयार केले आहे.
गर्दीत अडकायचे नसेल इथे पार्क करा वाहन
बाईक किंवा कारने येणार असाल तर शिवाजी नगर, स्वारगेट, मनपा, डेक्कन, वनाज, नळस्टॉप या मेट्रो स्टेशनजवळ पार्क करावी.
याशिवाय कोथरूडला वाहन पार्क करून तिथून वनाज किंवा नळस्टॉप या मेट्रो स्टेशनवरून संभाजी पार्क, मनपा याठिकाणी उतरता येईल. तिथून चालत लक्ष्मी रोडला जाता येईल.
पिंपरी चिंचवडवरून येणाऱ्या भाविकांना शिवाजी नगर येथे वाहन पार्क करता येईल.
मेट्रोने पुणे विसर्जन मिरवणूक मार्गांपर्यंत कसे जाता येईल?
> पिंपरी- चिंचवडवरून मेट्रोने येणाऱ्या भाविकांसाठी दोन पर्याय आहेत.
पर्याय पहिला
जिल्हा न्यायालय स्टेशनला उतरून मेट्रोचा मार्ग बदलावा लागेल. जिल्हा न्यायालय स्टेशनवरून मनपा, संभाजी बाग, डेक्कन या तीन स्थानकावरून विसर्जन मार्गावर जाता येईल. तिथून लक्ष्मी रोडला जाता येईल.
पर्याय दुसरा
मेट्रोने जिल्हा न्यायालय (Civil Court), कसबा पेठ किंवा मंडई मेट्रो स्टेशन गाठता येईल. तिथून चालत विसर्जन मिरवणूक मार्गावर जाता येईल.
> हिल व्ह्यू पार्क डेपो किंवा रामवाडीवरून येणाऱ्या प्रवाशांना मनपा, संभाजी बाग, डेक्कन या तीन स्टेशनवर उतरता येईल.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचे मार्ग कोणते?
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचे लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता हे चार मार्ग आहेत. तिथून सर्व गणपती शेवटी अलका चौकात येतात.
लक्ष्मी रोड येथे काय बघता येईल?
ढोल ताशा, पारंपारित वाद्य आणि साहसी खेळ बघण्यासाठी तुम्ही लक्ष्मी रोड येथे थांबू शकता. मानाच्या पाचही गणपतींची मिरवणूक याच रस्त्यावरून जाते.
टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता येथे काय बघता येईल?
ढोल पथकांसह तुम्हाला जर डान्स करायचा असेल तर तुम्ही टिळक रस्ता, केळकर रस्ता आणि कुमठेकर रस्ता येथे जावं.
गणेश विसर्जन मिरवणूक कुठून बघता येईल?
समाधान चौक, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, शगून चौक, विजय किंवा अलका टॉकीज चौकात तुम्ही मिरवणूक बघू शकता. सगळे गणपती बघायचेच असतील तर अलका चौकात थांबता येईल. मात्र, अलका चौकात गर्दी खूप असते हे विसरू नका.
मानाचे गणपती विसर्जन मिरवणूक वेळ, किती वाजता कोणत्या चौकात?
मंडळाचे नाव : बेलबाग चौक : टिळक चौक
कसबा गणपती : 10.15 : 2.45
तांबडी जोगेश्वरी : 10.30 : 3.00
गुरुजी तालीम : 11.00 : 3.30
तुळशीबाग : 11.30 : 4.00
केसरीवाडा : 12.00 : 4.30
महापालिका गणपती : 12.30 : 4.50
त्वष्ठा कासार गणपती : 1.00 : 5.20
श्रीमंत दगडूशेठ हलवाई : 4.00 : 7.30
जिलब्या मारुती गणपती : 5.30 : 9.45
हुतात्मा बाबू गेणू गणपती : 6.00 : 10.25
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी : 6.30 : 10.45
अखिल मंडई गणपती : 7.00 : 11.25
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला जाताना पार्किंग कुठे करता येईल?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात नागरिकांना वाहने आणता येणार आहेत; परंतु वाहने मिरवणूक असलेल्या रस्त्यावर नेता येणार नाही. पुणे पोलिसांनी शहराच्या आसपास वाहने पार्क करण्यासाठी 13 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली असून, तेथे वाहने पार्क करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पार्किंगसाठी आहेत ही 13 ठिकाणे
शिवाजी आखाडा वाहनतळ, मंगळवार पेठ (दुचाकी आणि चारचाकी), एसएसपीएमएस मैदान (दुचाकी आणि चारचाकी), स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), पेशवे उद्यान, सारसबाग, (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ, (दुचाकी), दांडेकर पूल ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी), संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), फर्ग्युसन महाविद्यालय मैदान (दुचाकी आणि चारचाकी), जैन हॉस्टेल मैदान, बीएमसीसी रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), मराठवाडा महाविद्यालय (दुचाकी), नदीपात्र ते भिडे पूल (दुचाकी आणि चारचाकी).
10 ठिकाणी नो पार्किंग
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता येथे नो-पार्किंग आहे. त्या सोबतच खंडोजीबाबा चौक ते वैशाली हॉटेलपर्यंत उपरस्त्यांना जोडणाऱ्या दोन्ही बाजूंना 100 मीटर परिसरात पार्किंगला बंदी केली आहे.