पुणे

पुण्यात हिर्‍या-मोत्यांची पखरण अन् वस्त्रालंकार; रंगबिरंगी रत्नांनी सजल्या गणेशमूर्ती

अमृता चौगुले

पुणे : हिर्‍या, मोत्यांच्या पखरणीने लखलखणारी आभूषणे अन् अलंकार… पैठणी, इरकलीने साकारलेले पीतांबर, शेला अन् फेटा घातलेल्या गणेशमूर्ती सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आकर्षक रंगसंगती असलेल्या, पेहरावाबरोबरच दागिन्यांत हिर्‍यांचा मुक्त हस्ते केलेला वापर तसेच मोत्यांची पखरण केलेल्या गणेशमूर्ती शहरात दाखल झाल्या आहेत. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे यंदा घरगुती गणपतींमध्ये पीतांबर, शेला नेसवलेल्या मूर्तींचा ट्रेंड शहरात पाहावयास मिळत असून, या गणेश मूर्तींना विशेष पसंती मिळत असल्याचे दिसून येते.

लाडक्या गणरायाचे रूप खुलून दिसावे यासाठी बाप्पाच्या मुकुटापासून सोंडपट्टा, बाजूबंद, कंठी, हार आदी आभूषणे दिसत असून, अलंकारांवर हिर्‍या – मोत्यांची पखरण करण्यात आली आहे. लेस, कुंदन, मोती, स्टोन चेन, बॉल चेन, रेडिमेड ब—ोच, भिकबाळी, शस्त्र, कापड व प्लास्टिकच्या फुलांचा वापराने या मूर्ती अधिक आकर्षक दिसू लागल्या आहेत. लखलखणार्‍या खड्यांमुळे गणरायाच्या मूर्तीला एक वेगळीच झळाळी मिळत असल्याने या मूर्तींना मोठी मागणी आहे. याखेरीज, अन्य मूर्तींच्या तुलनेत त्याची किंमतही वीस ते तीस टक्क्यांनी अधिक असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

मूर्तीवर प्रत्यक्ष आणखी वस्त्र नेसविण्याचा असलेला ट्रेंड एरवी मुंबईमध्ये सार्वजनिक गणपतींबाबत दिसतो. तो आता शहरातील घरगुती गणपतींमध्ये आला आहे. पैठणी तसेच इरकलीमधून साकारलेल्या पितांबर व शेले नेसवलेल्या मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडतात. प्रत्यक्ष वस्त्र नेसविण्याच्या दृष्टीनेच या मूर्ती घडविल्याने त्यांची सुबकता अधिकच उठावदार व आकर्षक दिसते. विविध प्रकारच्या कपड्यांचा वापर करून त्याला जरीची किनार जोडलेल्या या मूर्तींचा ट्रेंड यंदा शहरात पाहायला मिळत आहे. बाजारात असलेल्या या मूर्तींची उंची दोन फुटांच्या वर असून, त्यांची किंमत तीन हजार रुपयांवर आहे.

घरगुती गणपतीपासून सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींवर खडे जडविण्याचे काम करण्यात आले आहे. यामध्ये, दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी गणपती तसेच अखिल मंडईच्या गणेशमूर्तीवर कलाकुसर करताना कस लागतो. बाप्पाची मूर्ती ही इतरांपेक्षा वेगळी असावी, अशी भावना प्रत्येकाची असते. त्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांसाठी आकर्षक मूर्ती घडविल्या आहेत. दरवर्षी या मूर्तींच्या मागणीत वाढ होत आहे.

– आमिष भोज, डायमंड वर्क आर्टिस्ट

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT