गँगस्टरच्या नावे धमकी; कॉन्ट्रक्टरकडून सव्वा कोटींची मागणी File Photo
पुणे

Pune Crime News: गँगस्टरच्या नावे धमकी; कॉन्ट्रक्टरकडून सव्वा कोटींची मागणी

बेकायदा सावकारीप्रकरणी महिलेसह 5 जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Pune extortion case

पुणे: बेकायदा सावकारी करणार्‍या कल्याणीनगरमधील एका महिलेसह पाच जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील गँगस्टरच्या नावे धमकी देत कॉन्ट्रक्टरकडे सव्वा कोटीची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 90 लाख रुपये कॉन्ट्रक्टरने व्याजाने घेतल्यानंतर त्यापोटी मुद्दल, व्याज आणि दंड असे मिळून 1 कोटी 13 लाख 5 हजार रुपये परत करूनही पैशाची मागणी करण्यात येत होती.

याप्रकरणी ज्युली विनय चाल्स, मुलगा एलन विनय चाल्स, स्टीफन विनय चाल्स (रा. सर्व. कल्याणीनगर, पुणे), पंकज नारायण जाजू, अण्णा नावाची अनोळखी व्यक्ती या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कॉन्ट्रॅक्टरच्या 32 वर्षीय मुलाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. 2018 मध्ये सरकारी कामाचे कंत्राट घेऊन ते पूर्ण करण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. ज्युली त्यांच्या ओळखीची आहे. तिने फिर्यादीला तिच्या ए.एस.एस. मार्केटिंग कंपनीमार्फत पैसे मिळवून देते, असे सांगितले.

ज्युलीकडून फिर्यादींनी 90 लाख रुपये व्याजाने घेतले. मात्र, तिच्याकडे सावकारीचा परवाना नसल्यामुळे तिने फिर्यादींच्या वडिलांकडून कर्ज देताना त्यांच्या कंपनीचे सही केलेले कोरे लेटरहेड, सही केलेले कोरे स्टॅम्पपेपर आणि चेक घेतले. हा व्यवहार ज्युलीच्या कल्याणीनगर येथील घरी झाला होता. फिर्यादीने 90 लाखांच्या कर्जापोटी 1 कोटी 13 लाख 5 हजार 400 रुपये परत केले. मात्र, त्यानंतरदेखील ज्युली फिर्यादींकडे पैसे मागत होती.

मार्च 2023 मध्ये ज्युली, तिचा मुलगा अ‍ॅलन आणि एक अनोळखी व्यक्ती फिर्यादींच्या घरी आले. फिर्यादींनी त्यांना आपला व्यवहार पूर्ण झाला असून, तुम्ही आमची घेतलेली कागदपत्रे परत करा, असे सांगितले. त्या वेळी त्यांनी परत करण्यास नकार देऊन फिर्यादीकडे एक कोटी 25 लाख रुपयांची मागणी केली.

ज्युलीने त्या वेळी तिच्यासोबत आणलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवून तुला दिलेले पैसे या व्यक्तीचे आणि अण्णा नावाच्या माणसाचे असून, दोघे मुंबईचे गँगस्टर आहेत. तसेच ज्युलीने तिच्यासोबत आणलेल्या एका व्यक्तीचे नाव पंकज नारायण जाजू ऊर्फ अगरवाल असल्याचे सांगितले.

पैसे परत न केल्यास फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने त्यांच्यावर दबाव आणला. फिर्यादींच्या वडिलांकडून घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे ज्युलीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध 2023 मध्ये येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याबाबत न्यायालयात ‘क वर्ग समरी’ दाखल करण्यात आल्याचे फिर्यादींनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT