पुणे

Pune Crime : गणेशोत्सवात झारखंडच्या टोळीने चोरले 52 मोबाईल; 16 लाखांचे मोबाईल जप्त

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणार्‍या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त करण्यात आले आहे. श्यामकुमार संजय राम (वय- 25, तीनपहाड नया, जि. सायबगंज, झारखंड), विशालकुमार गंगा महातो (वय-21, रा. तीनपहाड बाबूपूर, जि. सायबगंज, झारखंड), बादलकुमार मोतीलाल माहतो (वय-25, रा. महाराजपूर, जि. सायबगंज, झारखंड), विकीकुमार गंगा माहतो उर्फ बादशाह नोनीया (वय-19, बाबूपूर, तीनपहाड, जि. सायबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे साथीदार गोपी माहतो, राहुल माहतो (दोघेही रा. तीनपहाड, जि. सायबगंज, झारखंड) हे चोरटे येरवडा भागातून फरार झाले आहेत.

पोलिस अंमलदार अजित मदने, कुंडलिक केसकर यांना खबर्‍यामार्फत माहिती मिळाली होती की, मोबाईल चोरी करणारे संशयित हे उन्नतीनगर कॅनॉल येथे थांबले आहेत. सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोबाईल चोरीसाठी झारखंड येथे कट रचून पुण्यात आले. पुण्यातील मंडई परिसर, चित्रा चौक भाजी मंडई सारख्या ठिकाणी मोबाईल चोरल्याची कबुली दिली. यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता मोबाईल मिळून आले.

विकीकुमार गंगा माहतो उर्फ बादशाह नोनीया या आरोपीवर तीनपहाड येथील पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असून, तो फरार होता. विशालकुमार गंगा महातो याच्यावर तीनपहाड येथील पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलिस निरीक्षक विश्वास डगले, संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, अनिरुद्ध सोनावणे प्रशांत टोणपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गर्दीचा फायदा घेऊन चोरी

पुण्यातील गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरण्यासाठी हे आरोपी 12 सप्टेंबर रोजी तीनपहाड रेल्वे स्थानकात एकत्र भेटले. यानंतर हाटिया एक्सप्रेसने 14 सप्टेंबर रोजी पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर, येरवडा, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट आणि इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल चोरले.

आरोपींकडून 4 गुन्हे उघडकीस

हडपसर तपास पथकाने आरोपींकडून 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून 16 लाखांचे 52 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांत हडपसर पोलिसांनी 72 मोबाईल जप्त केले असून, मोबाईल चोरणार्‍या 9 परप्रांतीय चोरट्यांना अटक केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT