Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav: हा उत्सव कुणाचा..?

डीजेच्या दणदणाटात हरवलेले मांगल्य की लोकमान्यांच्या विचारांचा सामाजिक उत्सव? गणेशोत्सवाच्या खऱ्या अर्थाचा परखड वेध

पुढारी वृत्तसेवा

सुनील माळी

कर्णकर्कश, कान फाडून टाकण्याची हिंसक शक्ती असलेल्या स्पीकरच्या भिंतींचा-डीजे-डॉल्बी यंत्रणांचा?... बेभान होण्यासारख्या एकाही घटकाला स्पर्श न केल्यानं सर्वार्थानं भानावर असलेल्या पुणेकरांच्या छातीचे ठोके चुकवणाऱ्या स्पीकरच्या ठोक्यांचा?... प्रत्येक मिरवणुकीनंतर ऐकण्याची शक्ती कमी झालेल्या कार्यकर्त्यांच्या कानांचा?... अनेकांनी नंतरच्या महिन्यात डॉक्टरकडं जात तपासून घेतलेल्या अन् धडधड वाढलेल्या हृदयांचा?...

मिरवणुकीत बेधुंद, बेभान अंगे वेडीवाकडी करीत नाचणाऱ्या पोरांच्या टोळक्यांचा?... मिरवणुकीतल्या गाड्यांमधील गणेशमूर्तीखालीच ठेवलेल्या पिशवीतून दर तासानं बाटली काढून तोंडाला लावणाऱ्या हातांचा?...

उत्सवकाळात उत्तररात्री मांडवाखाली रंगलेल्या पत्त्यांच्या डावांचा?... त्यावर लावल्या जाणाऱ्या पैशांचा?... मंडळातल्या तरुण मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यापेक्षा दहा दिवसांसाठी काही लाखांमध्ये भाड्यानं तयार देखावे आणणाऱ्या भाऊंचा?...

'आमच्यावर कोणतीही बंधनं नकोत, आम्हाला दहाही दिवस रात्री उशिरापर्यंत कर्णकटू आवाजात ठोक्याची नवगीतं वाजवण्याची परवानगी द्या,' असा हट्ट आपापल्या नगरसेवक-आमदारांकडं धरणाऱ्या कार्यकर्त्यांचा?... कार्यकर्ते-आमदारांचा धोशा ऐकून 'कितीही वेळ नाचा, जनतेचे कान फुटले तरी चालतील; पण तुमची हौस भागण्यासाठी कितीही जोरात स्पीकर लावा, कितीही वेळ नाचा...' असं म्हणत कारवाईसाठी पुढं झालेले पोलिसांचे हात रोखणाऱ्या मंत्रिमंडळातल्या वरिष्ठ माननीयांचा?... मंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानत आपल्या कारवाईचं अस्त्र म्यान करणाऱ्या पोलिसांचा?...

निवडणुकीकडं डोळा ठेवून गल्लीबोळातल्या प्रत्येक मंडळाला लाखापासून दहा-बारा लाखांपर्यंतची देणगीरूपी खिरापत वाटणाऱ्या सत्तेच्या दलालांचा?... प्रत्येक बाप्पाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट ठेवणाऱ्या, हाती सोन्याच्या दूर्वा चढवणाऱ्या भावी लोकप्रतिनिधींचा?...

'शेवटच्या दिवशी आम्हाला नाचायला मिळालं नाही अन् डीजेचा आवाज दणाणला नाही, तर दहा दिवस आम्ही काम करणार नाही,' अशी दमबाजी मंडळाच्या अध्यक्षालाच करणाऱ्या कार्यकर्तेनामक पोरासोरांचा?...

उत्सवानिमित्त महापालिकेनं बोलावलेल्या बैठकीत 'डीजेनं सामान्य माणसांना त्रास होतो, त्यामुळं तो नको,' अशी सर्वसामान्यांची बाजू मांडणाऱ्या एकुलत्या एक कार्यकर्त्याच्या अंगावर धावून जाणाऱ्या, तुम्ही-आम्हीच निवडून दिलेल्या माननीय-सन्माननीय नगरसेवकांचा?.. त्याला बैठकीतून धक्के मारत, फरफटत बाहेर काढणाऱ्या सिक्युरिटी गार्डांचा?.. या अमानवी-राक्षसी कृत्याचा जाब विचारता 'माझ्यासमोर ते झालंच नाही,' अशी शहामृगी भूमिका घेणाऱ्या महापौरांचा?...

मिरवणुकीच्या तीस-पस्तीस-छत्तीस तासांमध्ये मिरवणूक मार्गांच्या आसपास असलेल्या हॉस्पिटलांत झोपेवाचून तळमळणाऱ्या रुग्णांचा?... रात्र सरली तरी मुख्य मिरवणुकीत यायलाच न मिळाल्यानं वाया गेलेल्या आराशींचा?... मिरवणुकीतलं आपल्या आधीचं मंडळ दोन चौक ओलांडून पुढं गेलं तरी त्याची तमा न बाळगता तारवटलेल्या डोळ्यांनी अन् भपकाऱ्याच्या निश्वासांनी नाचत राहणाऱ्या जमावाचा?...

नाही... नाही... हा गणेशोत्सव अन् विसर्जनाची मिरवणूक यापैकी कुणाचीच नाही... या उत्सवावर यापैकी कुणाचाच अधिकार नाही...

मग या उत्सवावर अधिकार कुणाचा?

हा उत्सव नेमका, खराखुरा कुणाचा?

ऐका तर मग...

माणसं एकत्र आणण्याचा एकमात्र हेतू ठेवून उत्सव सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारींचा हा उत्सव... त्यासाठी पेठांमधल्या केवळ ब्रह्मवृंदांच्याच देवघरात सोवळ्यानं पूजला जाणारा विघ्नहर्ता रस्त्यावर आणून तो सर्व जाती-धर्म-हातांना खुला करणारा, त्यामागच्या खंबीर, दूरदृष्टी असलेल्या मनांचा हा उत्सव... 'धार्मिक कमी आणि सामाजिक अधिक' या स्वरूपाचा अंमल करणाऱ्या एकशेबत्तीस वर्षांतल्या सर्व कार्यकर्त्यांचा हा उत्सव.

हा उत्सव स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांविरोधात निर्माण झालेल्या संतापाच्या उसळत्या लाटेचा. तसंच पुढं त्या स्वातंत्र्याचं रूपांतर सुराज्यात करणाऱ्या विधायक उपक्रमांचा.

वर्षभर मान खाली घालून त्याच त्या एकसुरी कामांच्या रगाड्यात गुंतलेल्या काबाडकष्टी हातांना आरतीच्या टाळ्या वाजवण्याची अन् चार घटका रंजनाची संधी देणारा हा उत्सव. गणेशापुढची आरास, देखावे, रनिंग लायटिंग बघून मन रिझवण्याची, उल्सहित होण्याची आणि पुढच्या वर्षभराच्या कामाला पुन्हा नव्या उमेदीनं सुरुवात करण्याची ऊर्मी देणारा हा उत्सव.

हा उत्सव घरातल्या बाळगोपाळांनी हट्ट धरून निवडलेला गणेश घरी आणताना येणाऱ्या मांगल्याच्या अनुभूतीचा, त्याच्या आरतीला जमा होणाऱ्या वाड्या-सोसायट्यांतल्या मित्रमंडळींमुळं सामाजिक समरसतेच्या नकळत होणाऱ्या जाणिवेचा...

हा उत्सव मंडळातल्या तरुण कार्यकर्त्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देण्याचा, त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्याचा, रात्ररात्र जागून पडदे रंगवताना केलेल्या हास्यविनोदांचा, दहा दिवसांच्या आरतीच्या वाटून घेतलेल्या जबाबदारीचा.

हा उत्सव शतकोत्तर बत्तीस वर्षांतल्या परिवर्तनाच्या अनेक टप्प्यांचा. पहिल्या टप्प्यातल्या मेळे-व्याख्याने-शास्त्रीय संगीत-ढोल-लेझीम-नृत्य-नाट्यांचा. नंतर पौराणिक-ऐतिहासिक देखाव्यांची जागा घेतलेल्या सामाजिक विषयांचा. रनिंग लायटिंगच्या टप्प्यानंतर पुढं कलाकारांच्या मदतीनं साकारलेल्या जिवंत देखाव्यांचा. नव्या तंत्रज्ञानानं दाखवलेल्या अवकाश मोहिमांचा, महिलांच्या चार दिवसांच्या अडचणींसारख्या नाजूक विषयाचं मार्गदर्शन करणाऱ्या समाजाभिमुख कार्यकर्त्यांचा.

हा उत्सव विधायकतेचं, सामाजिकतेचं अंग मोठं करणाऱ्या जय गणेश व्यासपीठासारख्या सामाजिक मंचातील तीन-चारशे मंडळांचा. कोरोनाकाळात गरजू रुग्णांच्या मदतीला धावलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या हातांचा.

हा उत्सव शिस्तबद्ध मिरवणुकीचा. महिला असो वा पुरुष, अंगी जोश आणणाऱ्या ढोल-ताशासारख्या रणवाद्यांच्या सुरेल निनादाचा. मर्यादित संख्या असलेल्या ढोल-पथकांचा. अचकट-विचकट, बेताल नाचणाऱ्या तरुणांची पावलं दर्जेदार-अभिजात अभिरुची लावणाऱ्या ढोल-ताशा पथकांकडं वळवणाऱ्या त्या पथकांच्या बहाद्दर नेत्यांचा. या ढोल-ताशा पथकांच्या सध्या दिसू लागलेल्या आगाऊ-जादा उत्साहाला आवर घालणाऱ्या विवेकी सामाजिक कार्यकर्त्यांचा.

हा उत्सव कानाला सुसह्य वाटतील एवढ्याच मोठ्या आवाजात चांगली गाणी, जुन्या काळापासून ते अगदी चालू जमान्यापर्यंतची चित्रपटगीतंही लावणाऱ्या कार्यकर्त्यांचा अन् त्यांचा आनंद लुटणाऱ्या रसिकांचा.

हा उत्सव रात्रभर उभं राहून किंवा फुटपाथवर चक्क बसकण मारून मिरवणुकीतल्या मंडळांच्या आराशीचा आनंद लुटणाऱ्या, माना वळवत-वळवत दगडूशेठ-मंडईचा गणपती लांबवर दिसतोय का? याचा अंदाज घेणाऱ्या अन् दोन्ही रथ समोरून जात असताना मोबाईलवरून फोटो टिपत, श्रद्धेनं जोडल्या जाणाऱ्या हातांचा, त्यानंतर तृप्ततेनं घरी परतणाऱ्या पायांचा...

...हा उत्सव बागडणाऱ्या बालकांचा, रंजनासाठी आसुसलेल्या तरुणांचा, सामाजिक उपक्रमांत भाग घेणाऱ्या प्रौढांचा, गोड मोदकाची चव चाखत प्रसन्नतेनं वाती वळणाऱ्या आजींचा... तुमचा, आमचा... सर्व पुणेकरांचा...

...म्हणूनच या उत्सवाला विकृतीकडं नेणाऱ्या मूठभरांना आपण लोकशाही मार्गानं रोखूयात... उत्सवाचं मांगल्य-पावित्र्य-सामाजिकतेचं भान पुन्हा आणूयात,

उत्सव पुन्हा रसरशीत करूयात...

... बोला... गणपती बाप्पा...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT