परदेशातील गणेशोत्सव Pudhari file photo
पुणे

Ganeshotsav Celebration: गणेशोत्सव ठरतोय महापालिका निवडणुकीचा प्रचार मंच

मतदारांची मने जिंकण्यासाठी चुरस

अमृता चौगुले

पुणे : शहरात येत्या काही दिवसांत महापालिकेची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वपक्षीय इच्छुक कामाला लागले आहेत. मोर्चेबांधणी सुरू झाली असून, राजकीय इच्छुकांसाठी गणेशोत्सव म्हणजे मतदारांशी जवळीक साधण्याचे उत्तम व्यासपीठ ठरत आहे. मंडप उभारणीपासून ते प्रसाद वाटपापर्यंत सर्वत्र इच्छुकांचा वावर वाढलेला दिसत आहे. (Latest Pune News)

सध्या सुरू असलेला गणेशोत्सव इच्छुक उमेदवारांसाठी एक मोठी संधी घेऊन आला आहे. या काळात माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार थेट गणेश मंडळांच्या आणि भक्तांच्या संपर्कात येत आहेत. निवडणुका लक्षात घेता अनेक इच्छुकांनी गणेश मंडळांना भरघोस देणग्या दिल्या आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा होत आहे.

इच्छुक हे फक्त गणेश मंडळांना देणग्या देऊन थांबलेले नाहीत, तर ते थेट मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विविध युक्त्या वापरत आहेत. दर्शनासाठी येणार्‍या गणेशभक्तांना पाण्याच्या बाटल्या, खाऊचे पदार्थ आणि इतर उपयोगी वस्तू भेट दिल्या जात आहेत. तसेच, मंडळांच्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गौरी-गणपती सजावट स्पर्धांमध्ये विजेत्यांना रोख बक्षिसे आणि आकर्षक भेटवस्तू देऊन मतदारांचे लक्ष वेधले जात आहे.

अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरेही आयोजित केली जात आहेत. शहरात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून, गणेशोत्सव हा इच्छुकांसाठी जनसंपर्काचे प्रभावी साधन ठरत आहे. एकीकडे मंडळांना आर्थिक सुगी लाभत आहे, तर दुसरीकडे भाविकांना विविध सुविधा आणि भेटवस्तूंचा लाभ मिळत आहे.

उपनगरांमध्ये अधिक स्पर्धा

इच्छुकांकडून गौरी-गणपती सजावट स्पर्धेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शहरातील मध्यवर्ती भागांच्या तुलनेत उपनगरांमध्ये या स्पर्धांना अधिक प्रतिसाद मिळत आहे. सर्वपक्षीय इच्छुकांनी स्पर्धेच्या विजेत्यांना रोख रक्कम देऊन आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT