पुणे : राज्य सरकारने गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सात दिवस ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकांचा वापर करण्यास परवानगी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे. (Pune Latest News)
ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिल्याबाबत यापूर्वीचा 31 जानेवारी 2025 रोजी आदेश देण्यात आला होता, त्यातबदल करून हा सुधारित आदेश देण्यात आला आहे. यानुसार गणेशोत्सवासाठी शनिवार, दि. 30 ऑगस्ट, रविवार 31 ऑगस्ट, सोमवार 1, 2, 3, 4 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर या सात दिवसांत रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करता येईल.
गणेशोत्सवाव्यतिरिक्त इतर प्रमुख सणांसाठीही ध्वनिनियंत्रण नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. यामध्ये नवरात्री उत्सवासाठी 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर रोजी सूट दिली आहे. ख्रिसमससाठी 25 डिसेंबर रोजी आणि वर्षाअखेरला 31 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेकांचा वापर करता येणार आहे. शिवाय, आवश्यकतेनुसार इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी परवानगी देण्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जिल्हाधिकार्यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून गणेशोत्सवात 7 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी देण्यातबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, ही सूट देताना ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 मधील नियम 3 व 4 आणि सुधारित नियम, 2017 मधील नियम 5, उपनियम (3) चे पालन करणे बंधनकारक आहे. झोनिंगनुसार निश्चित केलेल्या आवाजाच्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. शांतता क्षेत्रामध्ये ही सूट लागू होणार नाही. या आदेशामुळे गणेशोत्सव आणि इतर सणादरम्यान मंडळांना ध्वनी मर्यादेचे पालन करून उत्सव साजरा करणे शक्य होणार आहे.