Chilhewadi dam
ओतूर : चिल्हेवाडी परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चिल्हेवाडी धरण ९७ टक्के भरल्याची माहिती कुकडी पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आर. जी. हांडे यांनी दिली. सोमवारी (दि. २५) रात्री ११ वाजण्याचे सुमारास धरणाच्या सांडव्यातून २५०० क्युसेक पाणी मांडवी नदीत सोडण्यात आल्याने मांडवी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, नदीमधील पाण्याचे पंप, काठावरील शेती अवजारे व इतर साहित्य अथवा किनाऱ्यालगत असलेली जनावरे तात्काळ इतरत्र हलविण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन जलसंपदा विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चिल्हेवाडी, पाचघर, आंबेगव्हाण, रोहकडी, फापाळे शिवार, बाबीत मळा, ओतूर या गावांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
डिंगोरे, पिंपळगाव जोगा, मढ, माळशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, ओतूर आणि परिसरात पुरेसा पाऊस झाला नसून गेल्या तीन दिवसांपासून पावसाची केवळ भूरभूरच सुरू आहे. सद्यस्थितीत चिल्हेवाडी धरण ओव्हरफ्लो झाल्याने मांडवी नदीला ऊर्जितावस्था प्राप्त झाली असून ती वाहू लागली आहे. नदीला आलेल्या पाण्यामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. जनावरे, प्राणी, पक्षी यांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मार्गी लागल्याचे बोलले जात आहे.
ओतूर आणि परिसरात अद्यापपर्यंत मध्यम स्वरूपाचाच पाऊस झालेला आहे. त्यामुळे सोयाबीनसारखी पिके कोमेजली होती. पावसाची झालेली पडती भावना शेतकऱ्यांना उभारी देणारी ठरत आहे. पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.