पुणे : गणेशोत्सव हा ‘राज्य उत्सव’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. यंदा उत्सव अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा होईल आणि यासाठी सर्व उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यंदाचा
गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि भयमुक्त राहील. कोणतेही एकतर्फी निर्बंध लादले जाणार नाहीत. मागील वर्षीच्या परवानग्या ग्राह्य धरल्या जातील, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित ‘राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2024’ (पुणे शहर महापालिका क्षेत्र विभाग) चा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. त्या वेळी अमितेश कुमार बोलत होते.
या वेळी जगद्गुरू कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, आमदार हेमंत रासने, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, माणिक चव्हाण, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
कुमार म्हणाले, महाराष्ट्रामध्ये 30 वर्षांपासून वेगवेगळ्या शहरांत उत्सवात बंदोबस्त केला आहे. पुण्याच्या उत्सवाचे स्वरूप विशाल आहे. यंदाचा बंदोबस्त हा सोयी-सुविधांनी युक्त असणार आहे. जे शांतता व सुव्यवस्था बिघडवतील, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. वाहतूक नियोजनही चांगल्या प्रकारे केले जाईल.
आमदार हेमंत रासने म्हणाले, हा उत्सव 20 वर्षांपूर्वी निर्बंधमुक्त होता, तो पुन्हा तसा करण्याकरीता कार्यकर्ते सोबत आहेत. त्यामुळे उत्सव निर्बंधमुक्तच राहायला हवा. दारू पिऊन विघ्न आणणार्यांना पोलिसांनी सोडू नये. यंदा हा राज्यउत्सव दिमाखात साजरा करू.
अण्णा थोरात म्हणाले, यंदा अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी ग्रहण आहे. त्यामुळे दुसर्या दिवशी दुपारी 12 च्या आत विसर्जन मिरवणूक संपवायला हवी. यंदा मिरवणूक दोन तास आधी सुरू व्हायला हवी.
या वेळी उल्हास पवार, अंकुश काकडे, श्रीकांत शेटे यांची भाषणे झाली. त्यांनी हा उत्सव डीजेमुक्त असायला हवा, असे सांगितले.
भवानी पेठेतील शिवाजी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. एरंडवण्यातील श्री शनिमारुती बालगणेश मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळाने तृतीय, नवी खडकी येरवडा येथील नवज्योत मित्रमंडळ ट्रस्टने चौथे, तर भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्रमंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.