पुणे : खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा गणपती विसर्जन मिरवणूक मनाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर त्वरित मिरवणूक सुरू होईल, अशी घोषणा अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष आण्णा थोरात आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष पुनित बालन यांनी पत्रकार परिषदेत दिली. |(Pune News Update)
याबाबत बोलताना थोरात म्हणाले अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन मिरवणूक 6 सप्टेंबर रोजी असणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसया दिवशी म्हणजेच रविवार, दि. 7 सप्टेंबर टोजी दुपारी 12.37 वाजता खग्रास चंद्रग्रहण सुरू होत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार ग्रहणकाळात देवतांच्या मूर्ती झाकून ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्या वेळेच्या आधी म्हणजेच दुपारी 12 वाजण्यापूर्वी सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर यावर्षी पासून अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे दोन्ही मंडळे मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्या पासून मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्या मागोमाग मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मागील तीन वर्षातील अनुभव पाहता पोलीस प्रशासनाने वेळेचे पालन न केल्याने आमच्या मूर्ती वेळेत विसर्जनासाठी न्यायला अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे यंदा आम्ही वेळेपूर्वीच सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच बरोबर मिरवणुकीसाठी नेमलेली पथकांची संख्या शक्य तितकी कमी ठेवावी जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही, असे आवाहन ही थोरात यांनी यावेळी केले.
पुनीत बालन म्हणाले, आमच्या ट्रस्ट च्या पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन पथक कमी करण्याबाबत आमची चर्चा करणार आहे. नक्कीच आम्ही पथके कमी करण्यावर भर देऊ. त्याच बरोबर पाच मनाच्या गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक ही घेणार असून त्यांना ही आम्ही विनंती नक्कीच करू.