पुणे : शहराची लोकसंख्या, वाहने वाढताहेत. त्यामुळे पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत असून, विशेषतः मध्यवस्तीतील पेठांसह उपनगरांतील भाजी मंडई, मासळी मार्केटसारख्या बाजारांच्या जागा, रस्ते आक्रसत चालले आहेत. त्याला पर्याय म्हणून उभारलेल्या नव्या मंडईच्या इमारती वा संसाधने या बाजारघटकाच्या अडचणी विचारात न घेता उभारल्या गेल्यामुळे निरुपयोगी ठरत असून, कोट्यवधींची गुंतवणूक व्यर्थ ठरत आहे.(Latest Pune News)
तब्बल 15 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला गणेश पेठेतील मासळी बाजार अद्यापही वापराविना पडून आहे. येथील मासळी व्यावसायिक आजही येथील नाल्यावर मासे विक्री करीत असून, यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला आहे. ही नवी इमारत वापराविना पडून असून, तिची दुरवस्था सुरू झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती गणेश पेठ भागात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत किरकोळ आणि घाऊक मासळी बाजार भरतो.
2012 मध्ये महापालिकेने आधुनिक मासळी बाजार उभारण्याचे काम सुरू केले आणि 2018 मध्ये ही इमारत पूर्ण झाली. येथील गाळ्यांचे वाटपही झाले असून, व्यावसायिकांकडून वार्षिक भाडे वसूल करण्यात आले. काही दिवस विक्रेते येथे थांबले. पण, विविध अडचणींमुळे त्यांनी नाल्यावरच पुन्हा मासळी बाजार थाटला आहे. सध्या या इमारतीतील पाणी व वीजकनेक्शन बिघडले आहे. पार्किंगमध्ये प्रचंड कचरा असून, येथील नाल्यावर मासळी विक्री केल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे.
...म्हणून इमारतीत भरेना बाजार इमारतीकडील रस्त्यावर अतिक्रमणे अरुंद रस्त्यामुळे मासळीच्या गाड्या आत पोहचू शकत नाहीत
गाळ्यात पायऱ्या चढून जावे लागत असल्याने मासळींची जड ओझी पायऱ्यांवरून नेणे अशक्य
सांडपाणी व ड्रेनेजची सोय नाही
पुरेसे पाणी, स्वच्छतागृह नाही
व्यावसायिक म्हणतात...
महापालिकेने आमच्या गरजा लक्षात घेऊन इमारत बांधण्याचे आश्वासन दिले होते. पण, प्रत्यक्षात वेगळीच इमारत उभारली. गाळ्यांचा आकार लहान असून, मोकळी जागा नाही. पार्किंग खड्ड्यात असल्याने तेथे पाणी साचते. त्यामुळे आम्हाला नाल्यातच विक्री करावी लागते. मार्केट यार्डासारख्या सुविधांसह योग्य जागी पुनर्वसन व्हायला हवे.