awards for Ganesh mandals 2025
पुणे: आपण सर्व पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहतो, अशा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे पुढील पंधरवड्यात आगमन होत आहे. बाप्पाच्या या उत्सवाच्या आनंदात भर टाकणारी अशी ‘गणाधीश नवोन्मेष स्पर्धा’ ‘पुढारी वृत्तपत्र समूह’ आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने याही वर्षी आयोजित केली आहे.
उत्कृष्ट देखावे सादर करणार्या मंडळांना यंदाही भरघोस रकमेची पारितोषिके मिळतीलच; पण त्याचबरोबर या वेळचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे महिलांवरील अत्याचारांमध्ये होत असलेली वाढ विचारात घेऊन महिला सन्मानासाठी वर्षभर कार्य करणार्या मंडळांचा होणार असलेला गौरव. तसेच, गेल्या वर्षाप्रमाणेच आदर्श मिरवणूक काढणार्या मंडळांनाही पारितोषिके दिली जातील. (Latest Pune News)
विविध पारितोषिकांनी खच्चून भरलेल्या आणि उत्सव उत्साहात साजरा करणार्या विविध घटकांना प्रोत्साहन देणार्या गणेशोत्सव स्पर्धेचे स्वरूप खूपच अनोखे असे राहणार आहे.
या वेगवेगळ्या गटांत होणार्या स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे:
गट पहिला - उत्कृष्ट देखावा
कोणत्याही विषयावर देखावे करणारी मंडळे या गटात भाग घेऊ शकतील. त्यातही विशेषत: माहितीपर, विज्ञानावर आधारित किंवा समाजप्रबोधनात्मक विषयावरील तसेच नव्या एआय तंत्रज्ञानाचा (उदा. : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित) वापर असल्यास अधिक प्राधान्य दिले जाईल.
या गटातील पहिले पारितोषिक - 51 हजार रुपये, दुसरे पारितोषिक - 31 हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक - 21 हजार रुपये असेल. तसेच, प्रत्येकी अकरा हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही त्यात असतील.
गट दुसरा - महिला सन्मान
हुंडाबळीच्या, बलात्काराच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठीचा संदेश पुढील वर्षभर नागरिकांपर्यंत उत्तमरीत्या पोहचविणार्या मंडळांना वर्षअखेरीस पारितोषिके दिली जातील. ‘महिला मागत आहेत - समता, सन्मान, सुरक्षा आणि न्याय’ हे या संदेशाचे मुख्य सूत्र राहील. वर्षअखेरीस म्हणजेच पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या एक महिना आधी मंडळांनी आपण केलेल्या कामांचा अहवाल लेखी स्वरूपात पुढारी भवन, मित्रमंडळ चौक, पुणे 411009 या पुढारीच्या कार्यालयात सादर करायचा असून, त्या पाकिटावर स्पष्ट शब्दांत ‘पुढारी गणेशोत्सव महिला सन्मान स्पर्धेसाठी’ असा उल्लेख असावा. त्याचे परीक्षण केल्यावर पारितोषिके जाहीर केली जातील आणि इतर पारितोषिकांच्या वितरण कार्यक्रमात ती दिली जातील. या गटालाही पहिले पारितोषिक 51 हजार रुपयांचे, दुसरे पारितोषिक 31 हजार रुपयांचे आणि तिसरे पारितोषिक 21 हजार रुपयांचे असेल. तसेच, अकरा हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही या गटासाठी असणार आहेत.
गट तिसरा - आदर्श मिरवणूक
सर्वार्थाने आदर्श (डीजे व लेसरविरहित) मिरवणूक काढणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या गटातील स्पर्धा आहे. पथकांचा मर्यादित वापर करणार्या, रंजन-प्रबोधन-कलाकौशल्य यांचा समावेश असलेल्या, प्रेक्षकांवर परिणाम करणार्या, वेळेत मिरवणूक संपविणार्या मंडळांना पारितोषिके दिली जातील. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या मंडळांनी या मिरवणुकीचे चित्रीकरण केलेला पेन ड्राइव्ह मिरवणूक झाल्यावर सात दिवसांच्या आत पुढारी भवन, मित्रमंडळ चौक या कार्यालयात सादर करायचा आहे. या गटातील पहिले पारितोषिक 51 हजार रुपयांचे, दुसरे पारितोषिक 31 हजार रुपयांचे, तर तिसरे पारितोषिक 21 हजार रुपयांचे असेल. मात्र, या गटासाठी उत्तेजनार्थ पारितोषिके असणार नाहीत.
असा भरा अर्ज!
मंडळांसाठी गुगल फॉर्म आहे. मंडळांनी https://forms.gle/gLGf2GhqQRV4D8Lv6 या लिंकवरील गुगल फॉर्म भरायचा आहे. सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करूनही तुम्ही अर्ज भरू शकता. फॉर्म भरण्याचा अखेरचा दिनांक 24 ऑगस्ट 2025 आहे. या स्पर्धेबाबत आणखी माहिती हवी असल्यास कृपया 9823876769 या क्रमांकावर संपर्क साधावा.
’गणाधीश नवोन्मेष स्पर्धा’ कशासाठी?
सांघिक भावनेला, कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट देखावा स्पर्धा -सांघिकरीत्या काम करून परिणामकारक देखावा उभा करणार्या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या आणि देखाव्यातून कलात्मक आविष्कार साकारणार्या कलाकारांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी ही स्पर्धा आहे. त्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणार्या नव्या पिढीलाही विशेषत्वाने प्रोत्साहित केले जाईल.
महिलांना समान वागणूक देण्यासाठी महिला सन्मान स्पर्धा
स्वारगेट बसस्थानकावरील बलात्काराच्या सुन्न करणार्या प्रकारापासून ते धनाढ्य घरातल्याही महिलेचा पैशांसाठी छळ होणार्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘महिला मागत आहेत न्याय, समान वागणूक, समता आणि सुरक्षा’ हा संदेश लक्षात ठेवला पाहिजे. तो संदेश केवळ देखाव्यातून नव्हे, तर वर्षभराच्या उपक्रमांतून प्रभावीपणाने राबविणार्या मंडळांचे कौतुक करण्यासाठी ही स्पर्धा आहे.
सगळीच मिरवणूक आदर्श व्हावी, यासाठी आदर्श मिरवणूक स्पर्धा
आपल्या मंडळाच्या गणेशाची मिरवणूक आदर्श व्हावी, तिच्यामुळे कोणाही नागरिकाला त्रास होऊ नये, उलट त्यांचे रंजन व्हावे, त्यांच्यात उत्साह यावा, यासाठी झटणार्या कार्यकर्त्यांसाठी आदर्श मिरवणूक स्पर्धेचे आयोजन आहे. अशा आदर्श मंडळांची संख्या वाढत जाऊन शेवटी सगळी मिरवणूकच आदर्श मिरवणूक ठरावी, हा यामागील उद्देश आहे.
पारितोषिके किती अन् किती रकमेची?
उत्कृष्ट देखावा, महिला सन्मान आणि आदर्श विसर्जन मिरवणूक, या तीनही स्पर्धांसाठी पहिले पारितोषिक - 51 हजार रुपये, दुसरे पारितोषिक - 31 हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक - 21 हजार रुपये. तसेच, प्रत्येकी अकरा हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके.