पुणे: टिळक मार्गावरून येणार्या गणेश मंडळांसाठी लकडी पूल, विठ्ठल मंदिर, भारती भवन परिसरात स्वतंत्र हौदांची व्यवस्था, मुख्य स्वागत मंडप मागच्या बाजूने खुला ठेवणार, नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे ठेवली जाणार असे विविध आश्वासन टिळक मार्गावरून विसर्जन मिरवणूक काढणार्या गणेश मंडळांना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले होते. मात्र, त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात आली नसल्याचा आरोप गणेश मंडळांनी केला आहे.
‘पुढारी गणेशोत्सव व्यासपीठा’वर टिळक रस्ता विसर्जन मिरवणूक समन्वय समिती व विविध मंडळांच्या कार्यकत्यांनी अनेक मागण्या मांडल्या होत्या. याबाबत ‘पुढारी’ने आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली होती. या वेळी मंडळांच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडण्यात आल्या होत्या. या सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याचे आयुक्त नवल किशोर राम म्हणाले होते. मात्र, मंडळांच्या कुठल्याच मागणीची पूर्तता झाली नसल्याचे मंडळांनी सांगितले.
अलका टॉकीज चौकात गणेश मंडळांचे मिरवणूक रथ थांबवून विसर्जनास जाताना जास्तीचे अंतर चालत जावे लागते. यामुळे लकडी पूल, विठ्ठल मंदिर, भारती भवन परिसरात विसर्जनाच्या दिवशी टिळक रस्त्यावरून येणार्या गणेश मंडळासाठी स्वतंत्र विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र, पालिकेकडून अशी कोणतीच व्यवस्था करण्यात आली नाही. अलका चौकातील मुख्य स्वागत कक्ष हा टिळक रस्त्यावरून येणार्या मंडळांसाठी दोन्ही बाजूने खुला ठेवण्याच्या मागणीवर देखील कोणताच निर्णय झालेला नाही.
टिळक रस्त्यावरील मोकळ्या जागेत फूड मॉल उभारण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे देखील आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले होते. मात्र, यावर देखील कोणताच निर्णय झालेला नाही. चौक, हिराबाग चौक, अभिनव चौक, एमपी कॉलेज चौक, न्यू इंग्लिश स्कूल चौक या सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यात यावी व या मार्गावर मिरवणूक पाहण्यासाठी येणार्या महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी देखील मागणी मंडळांनी केली होती. मात्र, ही मागणी देखील पूर्ण करण्यात आलेली नाही असा आरोप मंडळांनी केला आहे.