Summary:
पुण्यातून कुरिअरद्वारे विविध देशांमध्ये मूर्ती पाठविण्यास सुरुवात
दर वर्षी पुण्यातून पाठविल्या जातात अंदाजे 8 ते 10 हजार मूर्ती
यंदाही संख्या वाढण्याचा अंदाज
मानाच्या पाच गणपतींच्या प्रतिकृतींसह दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकृतींची सर्वाधिक मागणी
पुणे : अनिता यांनी ऑस्ट्रेलियामध्ये राहणार्या नातेवाइकांसाठी पुण्यातून कुरिअरद्वारे शाडूची श्री गणेशमूर्ती पाठवली अन् मूर्ती मिळताच प्रत्येकाला आनंद झाला. अनिता यांच्याप्रमाणे अनेक जण परदेशात राहणार्या नातेवाइकांना पुण्यातून मूर्ती पाठवत आहेत. यंदाही पुण्यातून श्री गणेशमूर्ती विविध देशांमध्ये कुरिअरद्वारे पाठविण्यास सुरुवात झाली असून, आस्ट्रेलियासह अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, न्यूझीलंडसह दुबई येथे राहणार्या मराठी भाषकांकडून विविध रूपांतील मूर्ती पुण्यातून मागविल्या जात आहेत. दर वर्षी परदेशात अंदाजे 8 ते 10 हजार मूर्ती पाठविल्या जातात. यंदा हे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Pune Latest News)
मानाच्या पाच गणपतींच्या प्रतिकृतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीची सर्वाधिक मागणी होत आहे. विविध रूपांतील बाप्पा आता सातासमुद्रापलीकडे निघाले आहेत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून, प्रत्येक जण गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी करीत आहे. बाजारपेठांमध्ये तयारीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. व्यवसायानिमित्त आणि नोकरीनिमित्त विविध देशांमध्ये राहणार्या मराठीभाषकांनीही उत्सवाची तयारी सुरू केली असून, पुण्यातून कुरिअरद्वारे श्री गणेशमूर्ती मागविण्याला चांगला प्रतिसाद आहे. शाडूमूर्तींच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती पाठविण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कुरिअरच्या माध्यमातून मूर्ती पोहचायला चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत आहे. विशेष पद्धतीचे बॉक्स पॅकिंग करून आणि संबंधित देशांच्या नियमानुसार मूर्ती पाठविल्या जात आहेत.
याविषयी कुरिअर कंपनीचे अजय सुपेकर म्हणाले, आम्ही शाडूच्या मूर्ती विविध देशांमध्ये पाठवत आहोत. 6 ते 12 इंचाच्या मूर्ती आम्ही विशिष्ट प्रकारचे बॉक्स पॅकिंग करून पाठवत आहोत. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर या देशांमध्ये 25 मूर्ती पाठविल्या आहेत. मूर्तींसह गौरी गणपतीच्या पूजेचे साहित्यही पाठवत आहोत. येत्या काही दिवसांत बुकिंग आणखी वाढेल, असे वाटते.
विविध देशांमध्ये काही जण घरगुती गणेशोत्सव साजरा करतात, तर काही जण स्थानिक महाराष्ट्रीय मंडळे, ग्रुप्स आणि संस्थांकडून आयोजित गणेशोत्सवात सहभागी होतात. त्यामुळे मराठीभाषकांसह महाराष्ट्रीय मंडळे आणि स्थानिक संस्थांकडून श्री गणेशमूर्तींची मागणी होते. काही संस्थांकडून शिपिंगद्वारे एकत्रिपतपणे 400 ते 500 मूर्ती पाठविल्या जातात. मूर्ती पोहचल्यानंतर मराठीभाषकांसह स्थानिक मंडळांना त्या दिल्या जातात. व्हॉट्सअॅपद्वारे पुण्यातील स्थानिक व्यावसायिकांकडून विविध स्वरूपातील मूर्तींचे रील्स, व्हिडीओ, छायाचित्रे पाठविली जातात, त्यातून मूर्तीची निवड केली जाते आणि व्यावसायिकांना मूर्तींचे बुकिंग मिळते.
पूजेचे साहित्य
गौरी गणपतीचे साहित्य
सजावटीचे साहित्य
पूजा कशी करावी, याबाबतची माहिती देणारे पत्रक
आरतीसंग्रह
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई आदी ठिकाणी 25 मूर्ती पाठविल्या आहेत. त्यात पीओपी मूर्तींचे प्रमाण अधिक होते. आम्ही दर वर्षी 150 मूर्ती पाठवतो. हे प्रमाण यंदा वाढेल, असा अंदाज आहे. दर वर्षी पुण्यातून परदेशात अंदाजे 8 ते 10 हजार मूर्ती पाठविल्या जातात. यावर्षी हे प्रमाण वाढेल, असे वाटते. नातेवाईक मूर्ती पसंत करतात, त्याप्रमाणे आम्ही त्या बॉक्स पॅकिंग करून देतो. आम्ही व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून, त्याद्वारे आम्ही परदेशात राहणार्या मराठी भाषकांना मूर्तींचे फोटो, व्हिडीओ पाठवतो. ते पाहून त्यातून एका मूर्तीची निवड ते करतात आणि ती मूर्ती त्यांचे नातेवाइक किंवा आम्ही कुरिअरद्वारे पाठवतो. 6 इंचांची मूर्ती पाठविण्याला 1800 रुपये लागतात 12 इंचांची मूर्ती पाठविण्यासाठी 5 ते 6 हजार रुपये लागतात.सचिन डाखवे, श्री गणेशमूर्तींचे विक्रेते, कसबा पेठ
आम्ही दर वर्षी अमेरिकेतील न्यू जर्सीला 2 हजार गणेशमूर्ती पाठवतो. येथील स्थानिक मराठी भाषक या मूर्ती मागवतात, या मूर्ती आम्ही तयार करतो. श्रीगणेशाच्या विविध रूपांतील शाडूच्या मूर्ती आणि पीओपीच्या मूर्तींची मागणी होते. छोट्या आकाराला मूर्ती या शाडूच्या असतात, तर मोठ्या मूर्ती या पीओपीच्या असतात. वर्षभर आम्ही या मूर्ती तयार करण्याचे काम करतो. यंदाही मागणीप्रमाणे 2 हजार मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्ती अमेरिकेला पाठवणार आहोत.- नितीन कुंभार, मूर्तिकार