Ganesh Chaturthi Muhurat 2025
पुणे: चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती, बुद्धिदेवता अशा सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाने बुधवारपासून (दि. 27) मंगलमय पर्व सुरू होणार आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी आरास आणि सजावट करण्यात आली असून ढोल-ताशांच्या गजरात अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पांचे घरोघरी आगमन होणार आहे.
सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्येही मूर्ती प्राणप्रतिष्ठेसह विविध देखाव्यांची तयारी पूर्ण झाली आहे. पुढचे सात दिवस पुणे शहर, पिंपरी-चिंवडसह जिल्ह्यात चैतन्याचा सोहळा रंगणार आहे. Ganesh Chaturthi
गेल्या महिनाभरापासून गणेशोत्सवासाठी सजलेल्या बाजारपेठांमध्ये सजावट, पूजासाहित्या खरेदीसाठी झालेल्या उत्साही गर्दीने कधी एकदा बाप्पांचे आगमन होते, असे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी उत्सवाच्या पूर्वसंध्येला बहुतांश घरी तसेच मंडळांच्या मंडपात आणलेल्या बाप्पांच्या मूर्तींचे रूप पाहताच भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. (Latest Pune News)
बुधवारी मुहूर्तावर गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साह आणि आनंदाला भरती आली आहे. गणरायापाठोपाठ येणार्या गौरीपूजन तसेच ओवसापूजनाच्या तयारीसाठीही महिलांची लगबग वाढली आहे. बुधवारी गणेश आगमनापासून सुरू होणारा थाट गौरी आगमन, पूजन व विसर्जनापर्यंत आनंदाचा वर्षाव करणारा ठरणार आहे.
प्राणप्रतिष्ठेसाठी मुहूर्त
मूर्ती प्राणप्रतिष्ठा : बुधवारी सकाळी सहा ते साडेनऊ, सकाळी 11 ते दुपारी साडेबारा, दुपारी 2 ते 3 वाजून 45 मिनिटांपर्यंत शुभ वेळ आहे.
गौरी आवाहन : रविवारी सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांपर्यंत शुभवेळ आहे.
गौरीपूजन : सोमवारी पूर्ण दिवस शुभ वेळ आहे.
घरगुती गौरी विसर्जन : मंगळवारी सकाळी 6 ते रात्री 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत शुभ वेळ आहे.