

समीर भुजबळ
वाल्हे : पुरंदर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याने ओढे-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे बागायती भागातील अनेक शेतकरी सद्यःस्थितीत फुल शेतीकडे वळला आहे. कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या नजर अंदाजित हेक्टरी क्षेत्रांच्या माहितीनुसार, यावर्षी पुरंदर तालुक्यात झेंडूच्या लागवडक्षेत्रात वाढ झाली असून, यावर्षी 156.5 हेक्टर क्षेत्रात झेंडू पिकांची लागवड केली असल्याची माहिती, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी दिली.
मागील वर्षी पुरंदर तालुक्यातील एकूण चार कृषी मंडलामध्ये 139.2 हेक्टर क्षेत्रात झेंडू पिकांची लागवड करण्यात आली होती; मात्र,यावर्षी क्षेत्रात वाढ झाली असून, 156.5 हेक्टर क्षेत्रात झेंडू पिकांची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षापेक्षा 17.3 हेक्टर नजरअंदाजित क्षेत्रात झेंडूची लागवड करण्यात आली आहे.
पुरंदर तालुक्यात यावर्षी झेंडूचे उत्पादन चांगले येईल, अशी आशा येथील शेतकरीवर्ग व्यक्त करत आहेत. यामुळे तालुक्यात यावर्षी झेंडूच्या फुलांची टंचाई यावर्षी तरी भासणार नाही असे चित्र आहे. पुढील काही दिवसांतच गणेशोत्सवास सुरुवात होत असून, त्यानंतर भाद्रपद बैल पोळा, लगेचच नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी मोठ्या सणांच्या वेळी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे झेंडू उत्पादकांना सोन्याचे दिवस येतील, अशी आशा झेंडू उत्पादक शेतकरीवर्गाला लागली आहे.