पुणे

पुणे : गांधीजींचे ससूनमधील स्मारक होणार खुले

अमृता चौगुले

पुणे : ससून रुग्णालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर अपेन्डिसायटिसची शस्त्रक्रिया झाल्याने ते ऑपरेशन थिएटरच पुढे राष्ट्रीय स्मारक झाले. मात्र ही इमारत जुनी झाल्याने तिची डागडुजी सुरू असून, लवकरच हे स्मारक लोकांसाठी कायमस्वरूपी खुले करण्याचा संकल्प रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ठाकूर यांनी केला आहे.

दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची 154 वी जयंती देशभर साजरी केली जात आहे. त्या निमित्ताने गांधीजी जेथे जेथे राहिले त्या स्थानांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शहरात नगर रस्त्यावर आगाखान पॅलेस, पुणे स्टेशन परिसरात राष्ट्रीय नॅचरोपॅथी सेंटर येथे महात्मा गांधींची स्मारके आहेत. तेथे त्यांच्या काही वस्तू जतन केल्या आहेत. तशीच आणखी एक वास्तू आहे, ती म्हणजे ससून रुग्णालयातील महात्मा गांंधींची शस्त्रक्रिया झाली ती खोली.

कंदिलाच्या प्रकाशात झाली होती शस्त्रक्रिया

गांधीजींना इंग्रजांनी 1922 मध्ये सहा वर्षांचा कारावास ठोठावला, तेव्हा त्यांना पुणे शहरात नजरकैदेत ठेवण्यात आले. त्या वेळी त्यांच्या पत्नी कस्तुरबा त्यांच्यासमवेत पुण्यात आल्या. आगाखान पॅलेसमध्ये त्यांचा मुक्काम असताना त्यांना पोटात दुखू लागले. इंग्रज डॉक्टर कर्नल मेडॉक यांनी त्यांना तत्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला दिला. तेव्हा 12 जानेवारी 1924 रोजी ससून रुग्णालयातील दगडी इमारतीत पहिल्या मजल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. वीजपुरवठा खंडित झाल्याने कंदिलाच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्यात आली.

बापू भवनमध्ये चित्रप्रदर्शन आयोजन

स्टेशन परिसरातील राष्ट्रीय नॅचरोपॅथी केंद्रातील बापू भवनमध्ये प्रसिद्ध चित्रकार शंखा समंथा यांनी गांधीजींच्या काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. 2 ऑक्टोबरला सकाळी 9 पासून येथे विविध कार्यक्रम होतील.आगाखान पॅलेसमध्ये सकाळच्या सत्रात स्वच्छता अभियान व भजनाचे कार्यक्रम होणार आहेत.

महात्मा गांधीजींची शस्त्रक्रिया येथे झाली. त्यामुळे ससून हे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचे रुग्णालय झाले. सध्या या इमारतीची डागडुजी सुरू आहे. ती पूर्ण होताच हे स्मारक खर्‍या अर्थाने लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सध्या 2 ऑक्टोबर व 31 जानेवारी आणि इतर राष्ट्रीय दिनी हे स्मारक खुले असते. पुढे वर्षभर हे लोकांसाठी खुले करण्याचा विचार केला जाणार आहे. त्यासाठी शासनाची परवानगी घेण्यात येईल.

-डॉ. संजय ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT