पुणे: पुण्यातील बहुचर्चित शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता या दोन्ही मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या कल्पनेतून भुयारी मार्गाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. या रस्त्याचा डीपीआर करण्याचे काम सुरू असून, राज्य शासन व केंद्राच्या निधीतून हा रस्ता करण्याचे नियोजन आहे.
या मार्गाची पाहणी करण्यासाठी सोमवारी (दि. 23) केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी येणार होते. नितीन गडकरी आले; मात्र पाहणी न करताच निघून गेले. गडकरी येणार असल्याने वाहतूक रोखल्याने मोठी वाहतूक कोंडी दोन्ही मार्गांवर झाली होती. यामुळे नागरिक वैतागले होते. (Latest Pune News)
पुण्यातील शिवाजी रस्ता व बाजीराव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या मार्गांवर वाहतूक कोंडी ही रोजचीच होते. त्यामुळे या मार्गाने जाताना नागरिकांना नकोसे होते. येथील वाहतूक कोंडी कायम स्वरूपी सुटावी, यासाठी आमदार हेमंत रासने यांनी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा अशा अडीच किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला होता.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या निवेदनावर सकारात्मक विचार करून पाटबंधारे विभागाशी चर्चा करून या भुयारी मार्गाचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. शनिवारवाडा ते स्वारगेट हा शिवाजी रस्त्याचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 4 अंतर्गत असल्याने या मार्गावर भुयारी मार्ग होऊ शकतो, असे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले.
हा रस्ता तयार करण्यासाठी एक किलोमीटरसाठी 250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, असे देखील रासने यांनी सांगितले. दरम्यान, या मार्गाची पाहणी करण्यासाठी सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार होते. यासाठी प्रशासनाने तयारी केली होती. मात्र, नितीन गडकरी हे नियोजित वेळेपेक्षा उशिरा आल्याने नियोजन कोलमडले.
गडकरी येणार असल्याने शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. हे दोन्ही रस्ते अरुंद असल्याने तसेच गडकरींच्या पाहणीसाठी या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी रोखून धरल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
हेमंत रासने हे गडकरी यांच्यासह शिवाजी रस्ता मार्गाने जाऊन शनिवारवाड्याला वळसा घेऊन बाजीराव रस्ता अशी पाहणी करणार होते. मात्र, पोलिसांना याची माहिती नसल्याने वाहतूक अलीकडे रोखून धरण्यात आली. परिणामी, मोठी वाहतूक कोंडी झाल्याने नितीन गडकरी या मार्गाची पाहणी न करताच निघून गेले.
पाहणी झाली नसली, तरी निधी आणणार : आ. रासने
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहणी न करताच निघून गेल्याने आमदार हेमंत रासने यांना माध्यम प्रतिनिधींनी याचे कारण विचारले. या वेळी रासने म्हणाले की, गडकरी हे नियोजित कार्यक्रमातून वेळ काढून या पाहणीसाठी येणार होते. याची माहिती देखील प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, योग्य समन्वय न झाल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली.
गडकरी यांना पुढील कार्यक्रमाला जाण्यास उशीर होत होता, यामुळे ते निघून गेले. असे असले तरी त्यांना या भुयारी मार्गाबाबत निवेदन देण्यात आले असून, यासाठी मंजुरी मिळवून निधी आणला जाईल. सध्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ते येत्या 15 दिवसांत पूर्ण केले जाईल, असे हेमंत रासने म्हणाले.
महानगरपालिका आयुक्तांना वाहतूक कोंडीचा फटका
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार असल्याने महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम हे देखील या ठिकाणी येणार होते. मात्र, वाहतूक कोंडी झाल्याने त्यांचा ताफा शनिवारवाड्यापर्यंत पोहचू शकला नाही. यामुळे त्यांना पायी चालत यावे लागले. मात्र, त्यापूर्वीच नितीन गडकरी निघून गेले होते.