महापालिकेच्या थकबाकीला ठाम नकार! Pudhari
पुणे

Tax Dispute: फुरसुंगीकरांचा पुणे महापालिकेच्या थकबाकीला ठाम नकार! सुधारित कर बिले न मिळाल्यास न्यायालयाचा इशारा

नगरपरिषदेच्या करपावत्यांमध्ये महापालिकेची थकबाकी जोडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप; नाहरकत दाखला न मिळाल्याने इच्छुक उमेदवारांत अस्वस्थता

पुढारी वृत्तसेवा

फुरसुंगी: फुरसुंगी- उरुळी देवाची नगरपरिषदेकडून पुणे महापालिकेच्या थकबाकीसह कराच्या पावत्या दिल्या जात आहेत. याबाबत फुरसुंगी व उरुळी देवाची येथील रहिवाशांनी हरकत घेतली असून महापालिकेची थकबाकी वगळून नवीन सुधारित बिले नगरपरिषदेने न आकारल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (Latest Pune News)

फुरसुंगी व उरुळी देवाची नगरपरिषद स्थापन झाल्यापासूनचा कर भरण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखविली आहे. मात्र, पुणे महापालिकेचा थकीत कर या करासोबत जोडून येत असल्याने या गोष्टीला येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. पुणे महापालिकेने आमच्या दोन्ही गावात कोणत्याच प्रकारची भरीव कामे केली नसताना आम्ही पालिकेचा हा भरमसाठ जिझिया कर का भरायचा, असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते उल्हास शेवाळे, विशाल हरपळे, प्रवीण हरपळे, नीलेश पवार, कपिल भाडळे यांनी उपस्थित केला आहे.

फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन गावांचा पुणे महापालिकेत २०१७ साली समावेश करण्यात आला. मात्र, कर भरमसाठ व कामे नगण्य यामुळे येथील रहिवाशांनी पालिकेतून वगळण्याची मागणी केल्यामुळे अखेर राज्य सरकारने या दोन गावांची २०२४ मध्ये स्वतंत्र नगरपरिषद स्थापन केली. या दरम्यानच्या काळात रहिवाशांना सुमारे सात ते तेरा पट वाढीव कर पालिकेद्वारे आकारला गेला. विकासकामे तर दूरच मात्र अवाजवी कर लादल्यामुळे येथील अनेक रहिवाशांनी पालिकेचा कर भरणे टाळले, यामुळे पालिकेची थकबाकी वाढत गेली.

नाहरकत दाखल्याअभावी इच्छुकांमध्ये अस्वस्थता

सध्या फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक जाहीर झाली आहे. त्या अनुषंगाने नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी थकबाकी नसल्‍याचा दाखला जोडावा लागतो. मात्र, पालिकेची थकबाकी भरल्याशिवाय सध्यातरी नाहरकत दाखला मिळत नसल्‍याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कोणत्याही संस्थांचे हस्तांतरण होत असताना तेथील जंगम, स्थावर मालमत्तांसह कर्जे, थकबाकी यांचेही नियमांनुसार हस्तांतरण होते. त्यामुळे पुणे महापालिकेची थकबाकीही नगरपरिषदेच्या बिलांसोबत जोडून दिली जात आहे. पालिकेची थकबाकी भरण्यास ग्रामस्थांमधून होत असलेल्या विरोधाबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवून योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल.
प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT