पुणे: महापालिकेतून बाहेर पडून नगरपरिषद स्थापन झालेल्या फुरसुंगीला आता पुन्हा महापालिकेत यायचे आहे. या मागणीसाठी फुरसुंगीच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन फुरसुंगीचा पुन्हा महापालिकेत समावेश करावा, अशी मागणी केली.
पुणे महापालिकेत उरुळी देवाची, फुरसुंगीसह 11 गावांचा ऑक्टोबर 2017 मध्ये समावेश झाला. मात्र, महापालिकेत येऊनही नागरिकांना सोयी-सुविधा मिळत नसल्याची ओरड सुरू होती. (Latest Pune News)
तसेच महापालिकेत आल्यानंतर मिळकतकरापोटी अवाच्या सव्वा करआकारणी सुरू झाल्याने येथील नागरिकांनी त्यास विरोध सुरू केला. त्यामुळे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ग्रामस्थांची बैठक लावून उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन गावांना महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करावी, अशी मागणी केली होती.
मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत त्याला मंजुरी दिली. त्यामुळे 2022 मध्ये ही दोन्ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. सप्टेंबर 2024 मध्ये स्वतंत्र नगरपरिषद स्थापन झाली.
दरम्यान, आता उरुळी देवाची आणि फुरसुंगीच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा कारभार सुरू झाला असतानाच फुरसुंगीकरांनी पुन्हा पुणे महापालिकेत समाविष्ट करून घ्यावे, अशी भूमिका घेतली आहे. सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष आदींच्या आजी-माजी पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली.
यामध्ये अमोल हरपाळे, माजी उपसरपंच संजय हरपाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य रणजित रासकर, जितेंद्र कामथे, रमेश ढोरे, राहुल चोरघडे, मयूर हरपळे, प्रकाश हरपळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या सर्वांनी फुरसुंगी गावच्या विकासाचा महापालिका आणि नगरपरिषद यांच्यात फुटबॉल झाला आहे. महापालिकेत आल्यानंतर कोरोना कालावधीत गावचा विकास होऊ शकला नाही. आता पुन्हा नगरपरिषदेत येऊनही गावाला सेवा सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आम्हाला पुन्हा महापालिकेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार यांनी याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.
...नाहीतर स्वतंत्र महापालिका तरी करा!
आम्हाला महापालिकेत तरी घ्या, नाहीतर पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करा, अशीही फुरसुंगीतील नागरिकांची इच्छा आहे. उरुळी देवाची नागरिकांचीसुद्धा हीच भावना असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.