पुणे : अजित पवार यांनी बारामतीमध्ये अनेक वर्षे काम केले आहे. ते उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री असल्यामुळे मतदारसंघाकडे त्यांचे जास्त लक्ष आहे. मात्र, निधीचे वाटप करण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याचे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपाबाबत वक्तव्य केले होते, त्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत बावनकुळे यांनीसुद्धा निधी वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचे सांगितले. बावनकुळे एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुती 51 टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन विजयी होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत महायुतीला दोन तृतीयांश मते मिळतील, असेही त्यांनी सांगितले.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासंदर्भात विचारले असता बावनकुळे म्हणाले, ’निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली होती. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि स्थानिक आहे. राज्यात मात्र, सरकार म्हणून आम्ही एकत्र आहोत. निवडणूक संपल्यानंतर महायुतीचे नेते पुन्हा एकत्र येऊन चर्चा करतील. केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस यांचे सरकार राज्याचा विकास करणारे आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात असताना तेथील जनतेमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले आहे. राणे यांच्या सभा उधळून लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. मतभेद असतील तर एकवेळ चालेल. मात्र मनभेद आम्ही होऊ देणार नाही. निवडणुकीनंतर एकत्र बसून वाद मिटविले जातील.’
निवडणुकीत अन्य मागास वर्गाबाबतची (ओबीसी) आमची बाजू स्पष्ट आहे. यासंदर्भातील न्यायालयाचा आदेश शुक्रवारी येईल. ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तर सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी निवडणूक झाल्यानंतरच भूमिका मांडायला हवी होती. एका वर्षानंतर बोलून काही उपयोग नाही, असे उत्तरही बावनकुळे यांनी शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या विधानावर दिले.