सासवड: पुरंदर तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पावसासोबत वातावरणातील बदलामुळे अंजीर, पेरू, सीताफळ, डाळिंब बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक गणितावर पुन्हा संकट कोसळले आहे. या पावसाने फळबागांचे अर्थकारण ठप्प केले आहे.
पुरंदर तालुक्यातील 52 हेक्टरवर अंजीर लागवड केली आहे. सोनोरी, दिवे, काळेवाडी, गुर्होळी, राजेवाडी, वाघापूर, सुपे खुर्द, वनपुरी, आंबळेसह अनेक गावांमध्ये अंजिराचा खट्टा बहार आहे. (Latest Pune News)
मात्र, पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे अंजीर तडकणे, फळकुज, तांबेराचा प्रादुर्भाव वाढला आहे. लाल कोळी, मावा, तुडतुड्याचा प्रभाव आहे. पावसाच्या नुकसानीतून बचावलेल्या फळबागांवर औषध फवारणी सुरू आहे.
तालुक्यात सीताफळाची लागवड 2200 हेक्टरवर केली आहे. परंतु, काही प्रमाणात उन्हाळी सीताफळाची फुलधारणा सुरू आहे. मात्र, मे महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने फुलधारणाही गळून जात आहे.
त्यामुळे पुढील वर्षी सीताफळाचे उत्पन्न घटण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तालुक्यात डाळिंबाची 300 हेक्टरवर लागवड केली आहे. डाळिंबबागेत सध्या पाणी दिले जात नाही. बागेत उष्णता निर्माण केली जात आहे. परंतु, अवकाळी पावसामुळे डाळिंब झाडांना फुट निघून त्याची फळधारणेची क्षमता कमी होणार आहे.
मुसळधार पावसाने पेरूची झाडे उन्मळून पडली
तालुक्यात पेरूची 280 हेक्टर लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात अवकाळी पावसामुळे पेरूची झाडे काही ठिकाणी उन्मळून पडली. या पिकाला देवी, फळकुज, फळमाशीचा प्रादुर्भाव होणार आहे. पेरूला शंभर ते तीनशे रुपये प्रतिक्रेट सासवड बाजारपेठेत भाव मिळत आहे.
अवकाळी पावसाने पुरंदर तालुक्यात फळबागा, कांदा, तरकारी पिकांसह गहू, ज्वारी, हरभरा, पिकाचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजित नुकसान अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळविला आहे. वरिष्ठांचे आदेश आल्यास तत्काळ महसूल विभाग, कृषी विभाग व पंचायत समितीतर्फे संयुक्त पंचनामे करण्यात येतील.- सूरज जाधव, कृषी अधिकारी, पुरंदर
मागील दहा दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे अंजीर बागेचे मोठे नुकसान झाले आहे. बागांसाठी झालेला खर्च निघेल की नाही, याची शाश्वती नाही. सध्या झाडावर अंजीर तडकले आहेत. रोगराईचा प्रादुर्भाव वाढणार आहे.- अर्जुन रामचंद्र काळे, अंजीर उत्पादक शेतकरी, सोनोरी