सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील खेड एसईझेड (सेझ) मध्ये पोलिस चौकी उभारण्यासाठी खेड सिटीच्या वतीने तब्बल तीन गुंठे जागा पोलिस प्रशासनाच्या ताब्यात नावावर करून दिली आहे. परंतु, गेल्या आठ वर्षांपासून ही पोलिस चौकी कागदावरच राहिली आहे.
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असणार्या ‘खेड सेझ’मध्ये ही पोलिस चौकी सुरू करण्यासाठी प्रचंड पाठपुरावा करून देखील अद्यापही शासनाला मुहूर्त सापडला नाही. राज्यात उद्योगधंद्याला चालना देण्यासाठी व्यावसायिकांना सुरक्षित व पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शासनाची असते. (Latest Pune News)
पुणे जिल्हाच नाही, तर संपूर्ण राज्यातच सध्या औद्योगिक क्षेत्राची सर्वाधिक मागणी असलेल्या व देश-विदेशातील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार्या ‘खेड सेझ’ (विशेष आर्थिक क्षेत्र) सध्या वार्यावर सोडले आहे. ‘खेड सेझ’ क्षेत्रात गेल्या पाच-सहा वर्षांत खुनाच्या अनेक गंभीर घटना, ठेकेदारीतून होत असलेली स्पर्धा, भांडणे, हाणामारी हे प्रकार सातत्याने सुरू आहेत.
यामुळे कर्मचारी, कंपनी व्यवस्थापक, स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा नाही घातला, तर याचा थेट परिणाम औद्योगिक क्षेत्रात येणार्या गुंतवणुकीवर देखील होऊ शकतो.
खेड पोलिसांकडून एखादा गुन्हा झाल्यानंतर पोलिस चौकी सुरू करण्याची चर्चा केली जाते. पेट्रोलिंग सुरू करतात, बैठका घेतल्या जातात. या गोष्टी एखादी घटना घडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात केल्या जातात. गुन्हेगारांवर वचक बसावा, अशी कोणतीही ठोस पावले मात्र उचलली जात नाहीत.
कायमस्वरूपी पोलिस चौकी व कर्मचार्यांची आवश्यकता
खेड सेझमध्ये उद्योजकांना सुरक्षित वातावरण मिळावे, पोलिसांचा दबदबा वाढावा, यासाठी ‘खेड सेझ’मध्ये कायमस्वरूपी पोलिस चौकी व कर्मचारी नियुक्त करण्याची लेखी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यासाठी सेझमध्ये शिरूर-भीमाशंकर रस्त्यावर गोसासीजवळ गट नं. 704 मधील 3 गुंठे जागा पोलिस चौकीसाठी हस्तांतरित करून आठ वर्षे झाली आहे.
परंतु, अद्याप याबाबत काहीच हालचाली होताना दिसत नाही. गेल्या दोन ते तीन महिन्यांत हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. सध्या तात्पुरती पोलिस चौकी उभारण्यात आली असली, तरी पोलिस कर्मचार्यांचा अभाव असतो. शासनाने तातडीने ‘खेड सेझ’मध्ये पोलिस चौकी सुरू करावी, असे मत ‘खेड सेझ’मधील अधिकारी बादल आवटे यांनी व्यक्त केले.