चाकण: सुमारे 15 लाख 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य शासनाने आणली आहे. मोठ्या उद्योगांसोबतच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणात सवलती देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
उद्योगांच्या समस्यांबाबत चाकण येथे गुरुवारी (दि. 22) आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बाबाजी काळे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदींसह उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Latest Pune News)
यावेळी कामगारांसाठीच्या ईएसआयसी रुग्णालयासाठी 8 एकर जागा दिल्याचे पत्र मंत्री सामंत यांनी आमदार काळे यांना दिले. सामंत म्हणाले, चीनमधून उद्योग बाहेर पडत असून ते भारतात येत आहेत. त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. मोठ्या उद्योगांबरोबरच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षात दिलेल्या सवलतींपेक्षा पुढील एकाच वर्षात 6 हजार 100 कोटी रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरळीत वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने महापारेषण आणि महावितरण कंपनीने समन्वयाने आवश्यक तेथे उच्च दाब वाहिन्या, फीडर, वितरण ट्रान्सफॉर्मर आदी नवीन पायाभूत सुविधा तसेच अस्तित्वातील सुविधांचे विस्तारीकरण करावे, असे निर्देश सामंत यांनी दिले.
वीज यंत्रणेच्या दुरूस्तीसाठी आठवड्यात जो खंड घेण्यात येतो त्याचा सोईचा दिवस ठरविण्यासाठी महावितरण, महापारेषणने उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घ्यावा. उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी नोडल अधिकारी नेमावा, आदी सूचना सामंत यांनी केल्या.
उद्योगांना सुरळीत पाणीपुरवठा होईल याची काळजी घ्यावी, असे सांगतानाच उद्योगांनीही सांडपाणी प्रक्रिया करून ते पिण्याव्यतिरिक्त इतर उपयोगात आणल्यास अन्य उद्योगांना पाणी देता येईल. यासाठी मोठ्या उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही सामंत यांनी केले.
वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी कायमस्वरुपी तीन क्रेन उपलब्ध करून देण्यात येतील. वाहतूक नियमनासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी वॉर्डन उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्याला तात्काळ प्रतिसाद देत 10 वॉर्डनची जबाबदारी घेतल्याचे येथील उद्योग संघटनेने जाहीर केले.
भामा आसखेड धरणांतर्गत बुडीत बंधार्यांचे काम करण्यासाठी कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुढाकार घेण्याचे आवाहन आमदार बाबाजी काळे यांनी केले. त्याबाबत कंपन्यांनी सकारात्मक रहावे, असे आवाहन सामंत यांनी केले. तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि चाकण ते शिक्रापूर मार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने लवकरच काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीनेही आपल्या हद्दीतील रस्त्याच्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीस महापारेषण, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे महानगर, प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.